पुणे : आता ऑफलाइन परीक्षा घेण्याला प्राधान्य

उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांची माहिती : ऑनलाइनचाही पर्याय

पुणे – करोनामुळे महाविद्यालये पावणेदोन वर्षे बंद होती. आता ती प्रत्यक्षात नुकतीच सुरू झाली आहेत. विद्यार्थ्यांची उपस्थिती अधिक वाढावी, यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत. शिवाय, आता परीक्षाही ऑफलाइनच घेण्याला प्राधान्य द्यावे लागणार आहे, असे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी स्पष्ट केले आहे.

येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे स्वागत व संवाद या कार्यक्रमानिमित्त सामंत पुणे दौऱ्यावर होते. कार्यक्रमानंतर ते म्हणाले, “करोनामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा विचार करुन महाविद्यालये बंद ठेवून ऑनलाइन शिक्षण सुरू होते.
त्या काळात विद्यापीठासह महाविद्यालयांच्या सर्व परीक्षाही ऑनलाइनच घेण्यात आल्या. आता करोनाचे संकट काहीसे कमी झाल्यामुळे 20 ऑक्‍टोबरपासून महाविद्यालये प्रत्यक्ष सुरू झाली आहेत. मात्र, याच दिवशी शैक्षणिक वर्षातील पहिले सत्रही संपले. यामुळे काहीसा संभ्रमही निर्माण झाला. आता दुसरे सत्र कधी सुरू होणार, पहिल्या सत्रातील परीक्षा कधी व कशा होणार? असे प्रश्‍नही उपस्थित करण्यात येऊ लागले आहेत.

दरम्यान, आता शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी ऑनलाइन किंवा ऑफलाइन परीक्षा घेण्याचा पर्यायही खुला असेल. परीक्षा कशा घ्यायचा याचा निर्णय घेण्याचे विद्यापीठांना स्वातंत्र्य द्यावे लागणार आहे,’ असेही सामंत यांनी स्पष्ट केले.

खबरदार, नोकरी नाकाराल तर…
मागील वर्षी विद्यार्थ्यांच्या निकाल पत्रावर कोठेही करोनाचा उल्लेख नाही. विद्यार्थ्यांनी ऑनलाइन परीक्षा दिल्यामुळे शासकीय अथवा खासगी नोकऱ्यांत काही अडचणी निर्माण होतील का, असा प्रश्‍नही उपस्थित होत आहे. मात्र, अशा प्रकरणात विद्यार्थ्याची नोकरी नाकारल्यास संबंधितावर कारवाईही करण्यात येणार आहे, असेही सामंत म्हणाले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.