पुणे –पुणे जिल्ह्यातील अनधिकृत शाळांमध्ये एकाही विद्यार्थ्यांचा प्रवेश झाल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे, असा इशारा पुणे विभागीय शिक्षण उपसंचालक औदुंबर उकिरडे यांनी दिला आहे.
शालेय शिक्षण विभागाची कोणतीही परवानगी न घेता शहरी व ग्रामीण भागांत अनधिकृतपणे शाळा सुरू असल्याची बाब उघडकीस आली आहे. स्थानिक प्रशासनाकडून अनधिकृत शाळांचा शोध घेऊन त्याची यादी सादर करण्याच्या सूचनाही पुणे विभागीय शिक्षण उपसंचालकांनी अधिकाऱ्यांना दिल्या होत्या. त्यानंतर अधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीला पुणे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षणाधिकारी संध्या गायकवाड, माध्यमिक शिक्षणाधिकारी सुनंदा वाखारे, पुणे महापालिकेतील अधिकारी शुभांगी चव्हाण, पिंपरी-चिंचचड महापालिकेचे प्रशासन अधिकारी संजय नायकडे आदी उपस्थित होते.
पुणे जिल्हा परिषदेच्या अखत्यारित 27 अनधिकृत शाळा आढळून आल्या आहेत. यात हवेलीत सर्वाधिक 14 शाळांचा समावेश आहे. इंदापूरमधील 6, खेड 1, मावळ 2, मुळशी 1, पुरंदर 2, शिरूर 1 याप्रमाणे अनधिकृत शाळा आहेत. पिंपरी-चिंचवडमध्ये 8 अनधिकृत शाळा आढळल्या आहेत. पुणे महापालिका हद्दीतील अनधिकृत शाळांची यादी
अद्याप सादर झालेली नाही. ही यादी दोन दिवसांत सादर होण्याची शक्यता आहे.
अनधिकृत शाळांबाहेर लागणार फलक
औदुंबर उकिरडे यांनी या शाळांवर कारवाईचे निर्देश दिले आहेत. अनधिकृत शाळांमध्ये कोणत्याही परिस्थितीत विद्यार्थ्यांचे प्रवेश होता कामा नयेत याबाबत खबरदारी घ्यावी. अन्यथा संबंधित प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनाच कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. अनधिकृत शाळांसमोर प्रशासनाने तातडीने फलक उभारावेत. पालकांनी या अनधिकृत शाळांमध्ये प्रवेश घेऊ नयेत अशा सूचनाही फलकाद्वारे जारी कराव्यात, असे आदेश उकिरडे यांनी अधिकाऱ्यांना बजाविले आहेत.