pune news : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा राष्ट्रीय सेवा योजना विभाग व डीसीएम सोसायटी ऑफ इंडियाच्या नाना पेठेतील डॉ.बाबासाहेब आंबेडकर वाणिज्य व महर्षी विठ्ठल रामजी शिंदे कला महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने लोणीकंद येथे विशेष श्रमसंस्कार शिबिर घेण्यात आले. यात विविध उपक्रम राबविण्यात आले.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष डी.टी.रजपूत, जनरल सेक्रेटरी विशाल शेवाळे, खजिनदार सिद्धार्थ शेवाळे, सरपंच प्रियंका झुरुंगे, उपसरपंच राहुल शिंदे, नंदकुमार कंद, ग्रामपंचायत सदस्य सागर कंद, गौरव झुरुंगे, मुख्याध्यापक एकनाथ शिंदे,
महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. भारती सहस्रबुद्धे, उपप्राचार्य डॉ. नरेश पोते, कार्यक्रम अधिकारी डॉ. प्रवीण कांबळे व प्रा. प्रिती वाठारकर, डॉ.रूपाली भागवत आदींसह शिक्षकेतर कर्मचारी, राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
राष्ट्रीय सेवा ही योजना मुख्यतः विद्यार्थ्यांना शैक्षणिक संस्थांमध्ये शिकत असताना त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा आणि समाजाच्या कल्याणाप्रती आंतरिक भावना विकसित करून त्यांना समुदाय सेवेकडे वळवते. एनएसएस विद्यार्थ्यांना वैयक्तिकरित्या आणि एक गट म्हणून वाढवण्यास मदत करते, असे डी.टी.रजपूत यांनी सांगितले.
राष्ट्रीय सेवा योजनेचे मुख्य उद्दिष्ट महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रीयत्वाची जाणीव निर्माण करून त्यांना सामाजिक कार्याचा सराव करण्यास वाव देणे हे आहे. महाविद्यालयाचा परिसर स्वच्छ करणे , क्रीडांगणे तयार करणे, ग्रामीण भागातील रस्ते बांधणे, प्रौढ शिक्षण, वस्त्यांची सफाई, प्रथमोपचार, नागरिक संरक्षण आदींना पाधान्य देण्यात्त येते, असे विशाल शेवाळे यांनी स्पष्ट केले आहे.
स्वयंसेवकांनी ग्राम स्वच्छतेला जास्तीत जास्त महत्व दिले. स्वयंसेवकांनी मंदिराचा, शाळेचा परिसर, गावाचा परिसर स्वच्छ करून स्वच्छतेचा संदेश दिला. ग्रामस्थांवरती श्रमसंस्कार घडवण्यासाठी विविध तज्ञाचे प्रबोधनपर व्याख्याने घेण्यात आली.
लोकसंख्या नियंत्रण, जनजागृती पथनाट्य व पदयात्रेतून करण्यात आली. स्वयंसेवकांनी लेक वाचवा, पाणी वाचवा, बळीराजा वाचवा, वसुंधरा वाचवा हा महत्त्वाचा संदेश गावामध्ये ग्रामस्थांना दिला.