पुणे : गजबजलेल्या रस्त्यांवर मैत्रिणीवर कोयत्याने हल्ला करणाऱ्या युवकाला जीवाची पर्वा न करता पकडून युवतीचे प्राण वाचविणाऱ्या युवकांचा शहर शिवसेनेच्या वतीने सत्कार करण्यात आला. युवतीला वाचविणाऱ्या तीनही युवकांना शहर शिवसेनेकडून प्रत्येकी 25 हजार रूपयांचे बक्षिस जाहीर करण्यात आले आहे.
त्यातील, लेशपाल जवळगे या युवकाचा शहर कार्यालयात शहर प्रमुख नाना भानगिरे यांनी सत्कार केला. यावेळी लेशपाल याला 25 हजारांचे बक्षिस देण्यात आले असून या घटनेवेळी लेशपालच्या हाताला मार लागला असून त्याच्यावर शस्त्रक्रीया करावी लागणार आहे. त्याचा खर्चही शिवसेनेकडून केला जाणार असल्याचे शहर प्रमुख भानगिरे यांनी सांगितले.
उपशहर प्रमुख सुधीर कुरूमकर, शहर संघटक श्रीकांत पुजारी, प्रमोद प्रभुणे, युवासेना प्रमुख निलेश गिरमे, महिला आघाडी प्रमुख पूजा रावेतकर, उपशहर प्रमुख श्रृती नाझीरकर यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी तसेच कार्यकर्ते उपस्थित होते. मंगळवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास सदाशिव पेठेत हा प्रकार घडला होता.
भानगिरे म्हणाले की, या तीनही युवकांनी दाखविलेलं धाडस उल्लेखनिय आहे. हे युवक पुढे आले नसते तर अनुचित घटना घडली असती. मात्र, या तिघांनी पुढे येत युवतीला नवे आयुष्य दिले आहे. त्यामुळे त्यांचे करावे तेवढे कौतुक कमी आहे.
या शिवाय, या प्रकरण गंभीर असल्याने शहर शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांसह फरासखाना पोलिसांची भेट घेतली असून युवतीवर हल्ला करणाऱ्या युवकावर कठोर शिक्षा व्हावी अशी मागणीही करण्यात आली आल्याचे भानगिरे म्हणाले.