नवी दिल्ली – आदिपुरुष’ चित्रपट प्रदर्शित होऊन पंधरा दिवस होऊन गेले आहेत. मात्र या चित्रपटातील संवाद आणि पोशाखांवरुन मोठा वाद निर्माण झाला आहे. या चित्रपटातील काही संवाद बदलण्यातही आले आहेत. मात्र, हा वाद न्यायालयात पोहोचला असून न्यायालयानेही सुनावणी वेळी ‘आदिपुरुष’च्या निर्मात्यांना फटकारले आहे.
अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनौ खंडपीठात बुधवारी सलग तिसऱ्या दिवशी आदिपुरुष चित्रपटातील आक्षेपार्ह संवादप्रकरणी सुनावणी झाली. ज्यातील पात्रांची पूजा केली जाते असे रामायण कसे विनोदासारखे दाखवण्यात आले, असे न्यायालयाने म्हटले आहे.
सेन्सॉर बोर्डाने असा चित्रपट कसा पास केला? चित्रपट पास होणे ही घोडचूक आहे. चित्रपट निर्मात्यांना फक्त पैसे कमवायचे असतात कारण पिक्चर हिट होतो, असेही कोर्टाने म्हटले. तुम्ही कुराणवर एक छोटीशी डॉक्युमेंट्री तयार करून त्यात काही चुकीचे दाखवा, मग काय होऊ शकते हे तुम्हाला कळेल? कुराण, बायबललाही हात लावायला नको. मी स्पष्ट करू इच्छितो की, कोणत्याही धर्माला स्पर्श करू नका. कोणत्याही धर्माचे चुकीचे वर्णन करू नका, असेही न्यायालयाने यावेळी म्हटले आहे.
न्यायालय कोणत्याही धर्माचे पालन करत नाही. न्यायालय सर्व लोकांच्या भावनांचा आदर करते. या प्रकरणाबाबतच्या केवळ तोंडी टिप्पण्या आहेत. आता पाहा, संध्याकाळपर्यंत हेही छापून येईल, असेही कोर्टाने म्हटले.