वाघोली (प्रतिनिधी) – पुण्यातील केसनंद ते वाडेबोल्हाई रस्त्यावरील चिकू बन हॉटेल समोरील झाडाला सोमवारी स्कूल बस धडकून अपघात अपघात झाला आहे. अपघात होताच चालक त्या ठिकाणाहून फरार झाला. जवळच असलेल्या नागरिकांनी अपघातस्थळी धाव घेवून मदत केली. बसमध्ये १४ विद्यार्थी होते. यातील दोन विद्यार्थी गंभीर जखमी झाले आहेत. जखमी विद्यार्थ्यांना उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून अपघातामुळे बसमधील विद्यार्थी भयभीत झाले.
मिळालेल्या माहितीनुसार सदरचा अपघात सोमवार दिनांक (४ डिसेंबर) रोजी सायंकाळी चारच्या सुमारास घडला. दरम्यान, ही स्कूल बस द रायझिंग स्कूल या शाळेची होती. स्टेरिंग लॉक झाल्याने अपघात घडल्याची माहिती शाळा प्रशासनाने दिली तर चालकाचा ताबा सुटल्याने अपघात घडल्याची माहिती लोणीकंद पोलिसांनी दिली आहे.
चालक तुकाराम जनार्दन पवार हा (रा. वाघोली, पुणे) मुलांना बसमध्ये (क्रमांक एमएच-१२ एचबी २८३०) घेवून बस वाडेबोल्हाई-केसनंदकडे भरधाव वेगाने जात असताना चिकू वन/गारवा हॉटेल समोर बस आल्यानंतर बस चालकाचा बसवरील ताबा सुटल्याने बसने जोराची धडक झाडला दिली.
यावेळी रस्त्याच्या कडेला भाजी विक्री करणाऱ्या सीताबाई नारायण ढोरे (वय ७०) यांच्या खुब्याला गंभीर दुखापत झाली आहे. तर बस मधील दोन शाळकरी मुले जखमी झाले आहेत. जखमींवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. याप्रकरणी लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सहा. पोलीस निरीक्षक पडसळकर करत आहेत.
अपघातग्रस्त बस ही आमच्या शाळेची असून अचानक बसचे स्टेरिंग लॉक झाल्याने हा अपघात झाला आहे. जखमी विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर आहे.
– सुनंदा वडजे (संचालिका, द द रायझिंग स्कूल)
मुलाला खासगी दवाखान्यात दाखल केले असून मुलाची प्रकृती ठीक आहे. शाळा प्रशासनाने विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेची काळजी घ्यावी.
– पोपट हरगुडे (पालक)
द रायझिंग स्टार इंग्लिश मीडियम स्कूल स्कूलची बसच्या चालकाचा ताबा सुटल्याने अपघात झाला आहे. यामध्ये एक जेष्ठ महिला व दोन विद्यार्थी जखमी झाले आहेत. शाळा प्रशासनाने विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबत काळजी घेणे गरजेचे आहे.
– विश्वजित काइंगडे (वरिष्ठ पोलीस निरीक्षक, लोणीकंद)
वाघोली मधील सर्व शाळांच्या अंतर्गत असणाऱ्या सर्व स्कूलबस च्या वाहन चालकांची पोलिसांकडून चारित्र्य पडताळणी, परवाण्यात नमूद केलेल्या संख्येपेक्षा जास्त विद्यार्थ्यांची ने आण केली जाते.याशिवाय वाहनांची सर्व कागदपत्रे व रजिस्ट्रेशनची आरटीओकडून तपासणी करण्याबाबत प्रशासनाकडे पाठपुरावा करण्यात येणार आहे.
– संदीप सातव, (जिल्हाध्यक्ष युवा मोर्चा पुणे जिल्हा)