Amol Mitkari : अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासह राष्ट्रवादीतील काही नेत्यांच्या बंडामुळे राष्ट्रवादी कॉँग्रेसमध्ये दोन गट निर्माण झाले. यात एक गट हा अजित पवार यांना पाठिंबा देणारा आहे, तर दुसरा गट शरद पवार यांचे समर्थन करणारा आहे. यानंतर दोन्ही गटातील नेत्यांकडून आरोप-प्रत्यारोपाचे सत्र सुरू झाले आहे. भाजपकडून जी परिस्थिती शिवसेनेची करण्याचा प्रयत्न झाला, तशीच स्थिती अजित पवार व एकनाथ शिंदे गटाची होईल, अशी चर्चा लोकांमध्ये चालू आहे”, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे युवानेते रोहित पवार (Rohit Pawar) म्हणाले. यावर आता अजित पवार गटाचे नेते अमोल मिटकरी यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
अमोल मिटकरी म्हणाले की, “रोहित पवार अजित दादांवर आज ज्या पद्धतीने टीका करताहेत त्यांनी एकदा प्रामाणिकपणे जनतेला उत्तर द्यावं, भाजपसोबत जाण्याची पहिली भूमिका YB चव्हाण सेंटरला पवार साहेबांसमोर कशाला मांडली? मतदारसंघात निधी कमी पडत आहे, भाजपसोबत जावे लागेल हे वाक्य कोणाचे होते? आता हा तळतळाट कशासाठी?” असा सवाल त्यांनी ट्वीटद्वारे केला आहे.
रोहित पवार अजित दादांवर आज ज्या पद्धतीने टीका करताहेत त्यांनी एकदा प्रामाणिकपणे जनतेला उत्तर द्यावं भाजपसोबत जाण्याची पहिली भुमिका YB चव्हाण सेंटरला पवार साहेबां समोर कशाला मांडली? मतदारसंघात निधी कमी पडतोय भाजपसोबत जावे लागेल हे वाक्य कोणाचे होते?आता हा तळतळाट कशासाठी?😄
— आ. अमोल रामकृष्ण मिटकरी (@amolmitkari22) December 5, 2023
काय म्हणाले होते रोहित पवार?
“भाजपाकडून जी परिस्थिती शिवसेनेची करण्याचा प्रयत्न झाला, तशीच स्थिती अजित पवार मित्रमंडळ व एकनाथ शिंदे गटाची होईल, अशी चर्चा लोकांमध्ये चालू आहे. सगळ्यांनीच याची दक्षता घेतली पाहिजे. भाजपाला लोकनेते चालत नाहीत. लोकांमधले पक्ष चालत नाहीत. भाजपाबरोबर जाणारे पक्ष किंवा नेत्यांना हळूहळू राजकीय जीवनातून संपवलं जातं” असा गंभीर दावा रोहित पवार यांनी केला.
पाच राज्यातील निवडणुकांच्या निकालात राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड या तीन राज्यांमध्ये भाजपने सत्ता स्थापन केली आहे. यावरून विरोधकांनी भाजपवर टीका करण्यास सुरुवात केली आहे. यावरूनच सध्या राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत.