सीडनी : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान ऍनाथनी अल्बानीस यांच्या उपस्थितीत आज हॅरिस पार्क येथे उभारण्यात येणाऱ्या “लिटील इंडिया’चा शिलान्यास करण्यात आला. सीडनीच्या पश्चिमेकडील भागातील हॅरिस पार्क या भागात भारतीय रहिवाशांचे प्रमाण अधिक असून तेथे दिवाळी आणि ऑस्ट्रेलिया दिनासारखे सण, उत्सव मोठ्या उत्साहात साजरे केले जातात.
भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यानच्या मैत्रीच्या संबंधांमध्ये वाढ होण्यास ऑस्ट्रेलियास्थित या भारतीय वंशाच्या नागरिकांची भूमिका मोठी महत्वाची आहे. त्यामुळे या परिसराच्या प्रवेश मार्गाला “लिटील इंडिया’ असे नाव देण्यात आले आहे, असे परराष्ट्र मंत्रालयाने केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
हॅरिस पार्क हे एक संपन्न, गतिमान, बहुसांस्कृतिक केंद्र आहे. संस्कृतींच्या मिश्रणासाठी आणि मोठ्या भारतीय लोकसंख्येसाठी ते ओळखले जाते, असे पॅरामाट्टा सिटीने आपल्या वेबसाइटवर म्हटले आहे.
हॅरिस पार्कमधील विग्राम, मॅरिसन आणि स्टेशन स्ट्रीट यासारख्या ठिकाणी भारतीय खाद्यपदार्थांची 20 पेक्षा जास्त दुकाने आहेत. याशिवाय साड्या, बांगड्या आणि भारतीय मसाल्यांचीही दुकाने येथे असल्यामुळे आपण मुंबईत असल्याचा भास होतो, असेही वेबसाइटवर म्हटले आहे.