पुणे – राष्ट्रीय लोकअदालतमध्ये दावे निकाली काढण्यात पुणे जिल्ह्याने राज्यात पहिला क्रमांक पटकाविला आहे. रविवारी (दि. ३) झालेल्या लोकअदालतमध्ये तब्बल १ लाख ४० हजार ९०४ दावे निकाली काढण्यात आले आहेत. त्यामध्ये ३६९ कोटी ७८ लाख २० हजार २६८ रुपये तडजोड शुल्क वसुल करण्यात आले आहे.
प्रमुख जिल्हा न्यायाधीश आणि जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली या लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते. त्यासाठी ११९ पॅनेलची नेमणूक करण्यात आली होती. त्या माध्यमातून विविध न्यायालयांत प्रलंबित ४६ हजार ६३७ दावे तडजोडीसाठी लोकअदालतमध्ये ठेवण्यात आली होती. त्यापैकी २६ हजार ८१३ दावे निकाली काढण्यात आली.
त्यामध्ये २७१ कोटी ४७ लाख २९ हजार ४५० रुपये तडजोड शुल्क वसुल करण्यात आले. तर दाखल होण्यापूर्वीची १ लाख ९६ हजार ८०६ दाखलपूर्व प्रकरणे तडजोडीसाठी ठेवण्यात आली होती. त्यामधील १ लाख १४ हजार ०८८ दाव्यात तडजोड झाली आहे. त्यामध्ये ९८ कोटी ३० लाख ९० हजार ८१८ रुपयांचे तडजोड शुल्क वसुल करण्यात आल्याची माहिती पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव न्यायाधीश सोनल पाटील यांनी दिली.
लोकअदालतीत निकाली काढण्यात आलेल्या प्रकरणांमध्ये तडजोडयोग्य फौजदारी व दिवाणी, धनादेश बाउन्स, मोटार अपघात न्यायप्राधिकरण, कौटुंबिक वाद, कामगार वाद, भूसंपादन, नोकरी आणि महसूल विषयक प्रकरणे, विविध बॅंका, वित्तीय संस्था, दूरध्वनी व विद्युत विभागासह विविध दाव्यांचा संमावेश आहे.
याशिवाय मोटार वाहन कायद्यानुसार वाहतूक नियमभंग प्रकरणात नागरिकांना ठोठावलेल्या दंडात्मक ई-चलनाचे दावेही निकाली काढण्यात आले.
रविवारी (दि.३) राज्यात राष्ट्रीय लोकअदालत झाली. यामध्ये राज्यात सर्वाधिक दावे निकाली काढून पुणे जिल्ह्याने प्रथम क्रमांक पटकाविला आहे.
– सोनल पाटील, सचिव, पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकर