पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – कमांड हॉस्पिटल आणि लष्करात विविध पदांवर नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून फसवणूक करणाऱ्या कमांड हॉस्पिटलमधील सेवानिवृत्त क्लार्कचे आणखी काही कारनामे पुढे आले आहेत. त्याच्याविरुद्ध आता मार्केट यार्ड पोलीस ठाण्यातही एक गुन्हा दाखल झाला आहे. यामध्ये त्याने तब्बल ४० तरुणांची २८ लाखांची फसवणूक केल्याचे उघड झाले आहे.
कोंढवा पोलीस आणि मिलिटरी इंटेलिजन्सने संयुक्त कारवाई करत विनायक तुकाराम कडाळे याला मंगळवारी बेड्या ठोकल्या होत्या. कोंढवा पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या तक्रारीत त्याने सात ते आठ जणांची साडेतेरा लाखांची फसवणूक केली होती.
याप्रकरणी अजिंक्य तानाजी गंधीले (२२, रा. मुंढवा) याने तक्रार दिली आहे. गंधीले याचे फॅमिली फ्रेंड असलेल्या एका वकिलामार्फत त्याची आरोपी कडाळेबरोबर २०२१ मध्ये ओळख झाली होती. त्याने कमांड हॉस्पिटल येथे संगणक ऑपरेटर, लेखनिक, माळी, वॉर्ड सहायिका, चौकीदार अशा पदांसाठी नोकर भरती होणार असल्याचे सांगितले होते.
गंधीले नोकरीच्या शोधात असल्याने तसेच लष्करात संधी मिळत असल्याने त्याने ही माहिती नातेवाईक आणि मित्रांना सांगितली. त्यानुसार मार्केटयार्ड येथे कडाळे याची भेट घेतली. कडाळेने फिर्यादीला लष्कराचे ओळखपत्र दाखवून विश्वास संपादन करत वर्ग तीनसाठी ६० हजार आणि वर्ग चारसाठी ७० हजार रुपये बँक खात्यात जमा करण्यास सांगितले.
पुन्हा काही दिवसांनी कडाळे यांची भेट घेतल्यावर त्याने सिलेक्शन कमिटीचे पत्र दाखवले. ज्यात कडाळेचे नाव होते. त्यामुळे तरुणांचा विश्वास बसला. यानंतर भरतीची जाहिरात, तसेच प्रक्रिया सुरू न झाल्याबद्दल कडाळेकडे विचारणा केली. मात्र त्याने कोविड असल्याने प्रक्रिया रखडल्याचे सांगितले. तसेच कॉन्फरन्स कॉल करून कमांडंडशी बोलने करून दिले.
समोरील व्यक्ती कमांडंड असल्याचे सांगत हिंदीतून बोलत होता. तरुणांनी खूपच तगादा लावल्यावर त्याने व्हॉटसअपवर एक जाहिरात पाठवून दिली. त्यानंतर सगळ्यांची कागदपत्रे गोळा केली.
परीक्षेचे ॲडमिट कार्ड पाठवून परीक्षा १२ फेब्रुवारी २०२३ रोजी कमांड हॉस्पिटल येथे असल्याचे सांगितले. मात्र अधिकाऱ्यांच्या नावाच्या ठिकाणी व्हाईटनर लावण्यात आल्याने ते बोगस असल्याचे उघड झाले. गंधीले व इतर तरुणांनी पैशाची मागणी केली असता, घेतलेले पैसे कोविडमध्ये मृत्यू पावलेल्यांसाठी वापरण्यात आले आहेत.
यामुळे ते परत मिळू शकणार नाहीत, असे कडाळे यांना सांगितले. नंतर त्याने फोन बंद करून पळ काढला. तरुणांनी कमांड हॉस्पिटलमध्ये चौकशी केली असता, तो २०२२ मध्ये क्लार्क पदावरून निवृत्त झाल्याचे सांगण्यात आले. या प्रकरणाचा तपास पोलीस अधिकारी शीतल जाधव करत आहेत.