पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – वस्तू आणि सेवा कार्यालयातील (जीएसटी) राज्यकर अधिकारी महिलेस तीन हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडले. याप्रकरणी येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
याप्रकरणी राज्यकर अधिकारी मालती रमेश कठाळे (४३) यांच्याविरुद्ध येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी एका व्यावसायिकाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (एसीबी) तक्रार दिली होती.
तक्रारीची पडताळणी करण्यात आल्यानंतर बुधवारी सायंकाळी वस्तू आणि सेवा कर कार्यालयात सापळा लावून कारवाई करण्यात आली. तक्रारदाराने पत्नीच्या नावाने जीएसटी क्रमांक मिळवण्यासाठी ऑनलाइन अर्ज सादर केला होता. अर्ज राज्यकर अधिकारी मालती कठाळे यांच्याकडे प्रलंबित होता.
त्यानंतर कठाळे यांनी तक्रारदार व्यावसायिकाशी संपर्क साधून त्याला जीएसटी कार्यालयात बोलावून घेतले. जीएसटी क्रमांक देण्यासाठी तीन हजार रुपयांची लाच मागितली. तक्रार आल्यानंतर शहानिशा करण्यात आली.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा लावून कठाळे यांना तीन हजार रुपयांची लाच स्वीकारताना पकडले. पोलीस अधीक्षक अमोल तांबे, अतिरिक्त अधीक्षक डाॅ. शीतल जानवे यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक नितीन जाधव आणि पथकाने ही कारवाई केली. पोलीस निरीक्षक प्रसाद लोणारे तपास करत आहेत.
भू-करमापकसह खासगी व्यक्ती ताब्यात
पुणे, – शिरुर भूमिअभिलेख कार्यालयातील भू-करमापकाला खासगी व्यक्तीसह लाच घेताना ताब्यात घेण्यात आले. त्याने शेतजमिनीची हद्द कायम करण्याच्या कामाकरिता शेतकऱ्याकडे पाच हजारांची लाच मागितली होती. तडजोडीअंती तीन हजारांची लाच घेताना दोघांना ताब्यात घेण्यात आले. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बुधवारी केली.
शिवराज यशवंत बंडगर (२४, शिरुर भूमिअभिलेख कार्यालय, भू-करमापक) आणि अमोल विष्णु कदम (२७) अशी ताब्यात घेण्यात आलेल्या व्यक्तींची नावे आहेत. तक्रारदाराने त्यांच्या दोन गटाची शेतजमीन मोजणी करण्यासाठी आणि हद्द निश्चितीसाठी शिरुर येथील भूमिअभिलेख कार्यालयात अर्ज केला होता.
यासाठी शासकीय शुल्क देखील भरले होते. मात्र, यासाठी बंडगर यांनी पाच हजारांची मागणी केली. तडजोडीअंती तीन हजार खासगी व्यक्तीमार्फत स्वीकारताना दोघांना ताब्यात घेण्यात आले. याप्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक निंबाळकर करत आहेत.