पुणे – समाविष्ट 23 गावांतील बोगस कर्मचारी भरती प्रकरणाच्या चौकशीला गती मिळाली आहे. मात्र, ही गती रोखण्यासाठी थेट वरिष्ठ पातळीवर “फिल्डिंग’ लावण्याची धडपड सुरू झाली आहे. त्यामध्ये ग्रामसेवक, सरपंचासह पदाधिकारी आणि बड्या अधिकाऱ्यांचाही समावेश असून, काहींनी तर थेट मंत्रालय गाठले आहे.
जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील 23 गावे नुकतीच पुणे महापालिकेत समाविष्ट करण्यात आली. गावे समाविष्ट होण्याची “कुणकुण’ लागताच एक ते दीड वर्षापासून येथील ग्रामपंचायतीमध्ये भरती प्रक्रिया सुरू झाली. त्यामध्ये काहींनी घरातल्यांनाच “लाभ’ दिला तर काहींनी मलिदा घेऊन लाभ दिला. या काळात जवळपास बाराशेच्या आसपास कर्मचारी भरती झाली. त्यामध्ये ग्रामपंचायतीमधील रिक्त जागांच्या तुलनेत चारशे ते साडेचारशे कर्मचाऱ्यांची भरती ही नियमीत असल्याचे दिसून येते.
मात्र, अन्य भरती ही “बोगस’ असून, कोणत्या कारणास्तव ही भरती झाली, त्यामध्ये काही आर्थिक व्यवहार झाला का? त्यांचे वेतन या सर्व बाबींची चौकशी समिती तत्काळ उपमुख्य कार्यकारी अधिकारी दत्तात्रय मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली नेमण्यात आली. चौकशी अंतीम टप्यात असताना चौकशी समिती अध्यक्षांची बदली झाली आणि चौकशी थांबली. मात्र, मागील दहा दिवसांपूर्वी पुन्हा त्याच अधिकाऱ्यांकडे चौकशी सोपविण्यात आली. त्यामुळे बोगस भरती प्रकरणात जे दोषी आहेत, त्यांचे धाबे दणाणले आहेत.
चौकशी समितीकडून या समाविष्ट गावांतील ग्रामसेवक आणि सरपंचांना नोटीस पाठवली आहे. त्यामुळे ज्यांना आपण केलेल्या चुकीच्या कृत्याची भीती वाटते, त्यांनी पुन्हा सुरू झालेली चौकशी कशी थांबेल यासाठी “गुप्त बैठक’ घेतली. यात वेळप्रसंगी “ठोस पावले उचलू, पण ही चौकशी पूर्ण होता कामा नये’ असा पवित्राच घेतल्याचे बोलले जात आहे. या बैठकीला काही बडे अधिकारी, पदाधिकारी मार्गदर्शन करत आहेत.
अशी असेल चौकशी समितीची पुढील प्रक्रिया
चौकशीला सुरुवात झाल्यावर संबंधित गावांतील सरपंच आणि ग्रामसेवक यांना नोटीस पाठवून सात दिवसांत खुलासा करण्यास सांगितले आहे. त्यामुळे हे सात दिवस संपल्यानंतर आलेल्या खुलाशांची नोंद करून घेण्यात येणार आहे. तसेच, संशयास्पद असलेल्यांची चौकशी करण्यात येणार आहे. त्यानंतर संपूर्ण प्रकरणाचा अहवाल तयार करून ग्रामविकास विभाग, विभागीय आयुक्त आणि जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे सादर होईल. विभागीयस्तरावर या अहवालाची पाहणी करून पुढील निर्णय घेण्यात येणार आहे.