पुणे – बालगंधर्व रंगमंदिराच्या पुनर्विकासासाठी सुमारे 100 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असल्याचे समोर आले आहे. हा आराखडा अंतिम नसला, तरी बांधकामासाठी 70 कोटी तर फर्निचर आणि इतर सुविधांसाठी 30 ते 40 कोटींचा खर्च असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. हा खर्च महापालिका करू शकणार असली, तरी “पीपीपी’ अर्थात पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप तत्वावरही ते बांधता येणे शक्य आहे. पण, त्याबाबत कोणताही निर्णय अंतिम नसल्याची माहिती महापालिका प्रशासनाने दिली आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या पुनर्विकास प्रकल्पाचे सादरीकरण नुकतेच पाहिले. त्यात त्यांनी काही सूचना दिल्या आहेत. तसेच, मुंबईत जिओच्या माध्यमातून उभारलेले नाट्यगृह पाहण्याच्या सूचनाही केल्या आहेत. पुढील आठवड्यात पुणे महापालिकेचे पथक मुंबईत जाणार आहे. त्यानंतर 15 दिवसांत सुधारित आराखडा तयार केला जाणार आहे.
महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व पु.ल. देशपांडे यांच्या संकल्पनेतून हे रंगमंदिर 54 वर्षांपूर्वी उभे राहिले. आपली कला सादर करण्याची एकतरी संधी “बालगंधर्व’ला मिळावी हे प्रत्येक कलावंताचे स्वप्न असते. 54 वर्षांपूर्वी बांधलेल्या बालगंधर्वला नव्याने उभारण्याची, व्यापक करण्याची गरज असल्याचेही लक्षात घेऊन तत्कालीन स्थायी समिती अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांनी स्थायी समिती अध्यक्ष असताना 2018 मध्ये बालगंधर्व रंगमंदिराच्या पुनर्विकासाची संकल्पना मांडली आणि अंदाजपत्रकात त्यासाठी तरतुदही केली. मात्र, त्यावरून कलाकार तसेच सांस्कृतिक क्षेत्रात दोन मतप्रवाह होते. तर करोनामुळे हे काम पुढे गेले नाही. त्यानंतर, आता सांस्कृतिक तसेच कला क्षेत्रातील मान्यवरांची समितीने नेमून पालिकेने पुनर्विकासाचे प्रस्ताव मागविले होते. त्यातील एक प्रस्ताव अंतिम करून नुकताच पवार यांच्या पुढे सादर करण्यात आला आहे.
असा आहे सुधारित आराखडा
*सध्या बालगंधर्वचा विस्तार 22 हजार स्क्वेअर फुट
*तो वाढवून साडेतीन लाख स्क्वेअर फुटांचे रंगमंदिर उभारणार
*सध्या 100 दुचाकी 25 ते 30 चारचाकी वाहनांची
*पार्किंग क्षमता इतकीच आहे.
*नवीन वास्तूत 800 ते 900 दुचाकी व जवळपास 350 चारचाकी वाहनांची पार्किंग
*कलावंत आणि रसिकांच्या मागण्या लक्षात घेऊन 1 हजार, 500 आणि 300 प्रेक्षक क्षमतेची तीन सभागृहे असतील.
*सध्या केवळ एक कलादालन उपलब्ध आहे. नव्या वास्तूत 10 हजार फुटांचे एक आणि प्रत्येकी 500 ते हजार फुटांची दोन अशी तीन *नवीन कलादालने उभारण्यात येतील.
आम आदमी पक्षाचे आंदोलन
बालगंधर्व रंगमंदीराच्या पुनर्विकासाच्या निषेधार्थ आम आदमी पक्षाने बालगंधर्व रंगमंदिर आवारात सोमवारी आंदोलन केले. या रंगमंदिराचा पुनर्विकास करायचा आहे, तर त्याची प्रक्रिया पारदर्शकपणे राबविण्यात का येत नाही? हा प्रस्ताव 2018 मध्ये आल्यानंतर कलाकार व नागरिकांनी आंदोलने केली होती. त्यानंतर प्रशासक आल्यावरच ही प्रक्रिया का करण्यात आली? शहरातील नागरिकांची आणि कलाकारांची मते घेऊनच हा प्रस्ताव मंजूर करावा, अशी मागणी “आप’ने केली आहे. नाट्य कलावंत सिद्धेश्वर झाडबुके, निर्माते शशी कोठावळे, “आप’चे राज्य प्रवक्ते डॉ. अभिजित मोरे यांच्यासह पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते.