पुणे –पुणे-दानापूर-पुणे एक्स्प्रेसला आता पारंपरिक आयसीएफ रेकच्या ऐवजी एलएचबी रेक जोडले आहेत. यासह या कोचेसमध्ये आधुनिक फ्लेमलेस पॅन्ट्री कार जोडली आहे. त्यामुळे आता पॅन्ट्री कारसाठी गॅसची आवश्यकता भासणार नाही. परिणामी, इंधनाची बचत होणार आहे.
या एक्स्प्रेसला “एलएचबी’ कोचेस जोडले आहेत. हे कोचेस अद्ययावत असून, स्टेनलेस स्टीलपासून बनवलेले असल्याने कमी वजनाचे आणि अपघात प्रतिरोधक आहे. इलेक्ट्रिक इंजिनमध्ये असलेल्या हेड-ऑन जनरेशन प्रणालीद्वारे 25 हजार केव्ही विजेचे रुपांतर केले जात असून, त्याचा उपयोग या कोचेसमधील दिवे, पंखे आणि एअर कंडिशनर आदी विद्युत उपकरणांना वीजपुरवठ्यासाठी जातो. तर फ्लेमलेस पॅन्ट्री कारमध्ये स्वयंपाकासाठी उपलब्ध इंडक्शन हीटिंग सिस्टमला हेड-ऑन जनरेशन (एच.ओ.जी) द्वारे ऊर्जा पुरवली जाते. त्यामुळे या एलपीजीची गरज नाही. पारंपरिक पॅन्ट्री कारमध्ये गॅसच्या माध्यमातून स्वयंपाक केला जात होता. मात्र, आता फ्लेमलेस पॅन्ट्री कारमुळे सिलिंडर लावण्याची आवश्यकता नसल्याने खाद्यपदार्थ ठेवण्यासाठी अधिक जागा उपलब्ध झाली आहे. आग विझवण्यासाठी यात सुसज्ज अग्निशमन यंत्रणा देखील जोडण्यात आली आहे.