पुणे, दि. 23 -नवले पूल परिसरात नऱ्हे येथील स्मशानभूमीमुळे सेवा रस्त्याचे काम करता आलेले नाही. त्यामुळे या ठिकाणी शहरांतर्गत वाहतूक महामार्गावर येते. परिणामी, महामार्गावर वाहनांची गर्दी झाल्याने अपघाताची शक्यता वाढते. या पार्श्वभूमीवर स्मशानभूमी स्थलांतरित करण्याची सूचना विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी महापालिकेला केली आहे. या परिसरात महसूल विभागाची जागा पाहून त्या ठिकाणी स्मशानभूमी स्थलांतरित करण्यात येणार आहे.
विभागीय आयुक्त राव यांची नवले पूल परिसराची बुधवारी अचानक पाहणी केली. यावेळी महापालिका आयुक्त विक्रम कुमार, पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता या वेळी उपस्थित होते. दरम्यान, महामार्ग प्राधिकरणाकडून कालपासून अतिक्रमणे काढण्याची कारवाई मंगळवारपासून (दि.22) सुरु करण्यात आली आहे.
राव म्हणाले, सोमवारी बैठकीत तातडीने करायच्या उपाययोजनांबाबत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला (एनएचआय) काही सूचना केल्या होत्या. ही कामे सुरू झाली आहेत, की नाही हे पाहण्यासाठी बुधवारी अचानक या परिसराची पाहणी केली. या भेटीत स्थानिक नागरिक, ट्रक चालक यांच्याशी देखील संवाद साधून त्यांच्या सूचना जाणून घेतल्या.
“एनएचएआय’कडून कामे सुरू करण्यात आली आहेत. त्यामध्ये वाहनांचे वेग तपासण्यासाठी कॅमेरे बसविण्यात आले आहेत. तसेच सिंहगड पोलिसांनी काही ठिकाणी आणखी कॅमेरे बसविण्याची गरज असल्याचे सांगितले. त्यानुसार ते बसविले जातील. तसेच सेवा रस्त्यांवरील अतिक्रमणे महापालिका आणि पोलिसांकडून काढण्यात येत आहेत.
दरम्यान, या स्मशानभुमीमुळे “एनएचएआय’ला या ठिकाणच्या सेवा रस्त्याचे काम करता आलेले नाही. त्यामुळे या स्मशानभूमीपर्यंत आल्यानंतर सेवा रस्त्यावरील वाहने थेट महामार्गावर येतात. त्यामुळे महामार्गावरून येणारी जड वाहतूक आणि सेवा रस्त्यावरून येणारी हलकी वाहने एकाच वेळी महामार्गावर आल्याने अपघाताची शक्यता वाढते.