पुणे –शहरातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी महापालिकेकडून 1987 च्या विकास आराखड्यात प्रस्तावित केलेला सुमारे 36 किलोमीटरचा एलिव्हेटेड रस्ता विकसित केला जाणार आहे. या रस्त्यावर खर्चाने कमी प्रवासी वाहतुकीसाठी चांगला पर्याय असलेली निओ मेट्रो प्रस्तावित करण्यात आली आहे. त्याचा आराखडा महामेट्रोने महापालिका प्रशासनास गुरुवारी सादर केला. या मेट्रोसाठी महामेट्रोने महापालिकेच्या “एचसीएमटीआर’ रस्त्याच्या मार्गात काही बदल सुचविले असून महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडून प्रत्यक्ष जागेवर पाहणी करून अंतिम निर्णय घेतला जाणार आहे.
महापालिकेकडून प्रस्तावित असलेला “एचसीएमटीआर’ रस्ता जागेनुसार, 24 ते 30 मीटर असून आहे. त्यामुळे या मार्गावर प्रवासी वाहतुकीसह निओ मेट्रोचाही विचार केला जावा अशा सूचना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या होत्या. त्यानुसार, महापालिकेने हे काम महामेट्रोला देण्यात आले होते. त्यानुसार, महामेट्रोने आपला अहवाल सादर केला असला तरी, काही ठिकाणी “एचसीएमटीआर’ रस्त्याचे खांब 12 मीटर रस्त्यावर येणार आहे. त्यामुळे खालील बाजूचा रस्ता आणखी अरुंद होणार आहे. परिणामी, त्या रस्त्यावर वाहतुकीसाठी अडथळे निर्माण होतील. ही बाब लक्षात घेऊन मेट्रोने बदल सुचविले आहेत. त्यामुळे या बदलांच्या पाहणीसाठी पथ, बांधकाम, प्रकल्प, मालमत्ता व्यवस्थापन यांच्या अधिकाऱ्यांचे एक पथक तयार करण्यात आले असून महामेट्रोच्या अधिकाऱ्यांसमवेत हे अधिकारी ज्या ठिकाणी मार्गात बदल सुचविण्यात आले आहेत. त्याठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन माहिती घेतील आणि त्यानंतरच हे बदल अंतिम करण्यासंबंधीचा निर्णय घेतला जाणार आहे.