पुणे –सर्वोच्च न्यायालयाने दोन आठवड्यात महापालिका निवडणूक प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश दिले. यापार्श्वभूमीवर निवडणुकीसाठीची रणनिती ठरविण्यासाठी शहर कॉंग्रेसने गुरुवारी कॉंग्रेस भवन येथे बैठकीचे आयोजन केले होते. यात कोअर कमिटीच्या नेत्यांबरोबरच आजी-माजी नगरसेवक, ब्लॉक अध्यक्ष अशा सर्वांनीच हजेरी लावली. यामध्ये पक्षांतर्गत हेवेदाव्यांमुळे बैठकीचे रूपांतर वादावादीमध्ये झाले.
या बैठकीत एका माजी नगरसेवकाने पक्षातील काही नेते भाजपच्या नगरसेवकांना चांगले काम केल्याची जाहीर शबासकी देत आहेत, अशी तक्रार केली. माजी नगरसेवकांनी नाव न घेता हा आरोप केल्यामुळे तेथून वादाला सुरुवात झाली. शहरातील एका ज्येष्ठ नेत्यांने हस्तक्षेप करीत थेट नाव घे ना, असे आव्हान त्या माजी नगरसेवकाला देऊन सार्वजनिक कार्यक्रमात आपण कोणचेही वैयक्तिक कौतुक करतो, ही आपल्या पक्षाची संस्कृती आहे. याचा अर्थ आपण विरोधी पक्षाचे कौतुक करतो, असे नाही अशा शब्दात उत्तर दिले. आणि त्या बैठकीतून ते निघून गेले. एकीकडे माजी नगरसेवक आणि ज्येष्ठ नेत्यांच्या वाद सुरू असताना पालिकेतील माजी गटनेता आणि एका माजी मंत्र्यांमध्ये जुंपली. माजी गटनेत्यांनी अचानक अशी बैठक कशी बोलवता. लोक बाहेर गावी असतात. बैठकीचा अजेंडा नाही. वेळेवर आम्ही कसे पोहोचणार. त्याचा राग माजी राज्यमंत्र्यांना आला. त्यातून या दोघांमध्ये जुपंली. एक संपत नाही, तर दुसरा वाद सुरू होत असल्याचे पाहून हळूहळू अनेकांनी या बैठकीत काढता पाय घेण्यास सुरुवात केली.