झाडपडीच्या घटनेनंतर अधिकाऱ्यांची दुचाकीवरुन पाहणी
पुणे – स. प. महाविद्यालयातील जुने झाड कोसळल्याच्या घटनेनंतर महाविद्यालयाकडून अग्निशमन दलास याची माहिती देण्यात आली. मात्र, ही माहिती मिळाल्यानंतर अग्निशमन दलाच्या जनता वसाहत केंद्रातून वाहन जाणे आवश्यक असताना या ठिकाणचे अधिकारी दुचाकी घेऊन गेल्याचा प्रकार समोर आला आहे.
तसेच झाड पडलेली जागा ही खासगी असल्याचे सांगत, उद्यान विभागास या घटनेची माहिती देऊन हे अधिकारी निघून गेले. दरम्यान, या प्रकारामुळे खासगी जागेत दुर्घटना घडली तर अग्निशमन दल मदतीला जाणार नाही का, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
महाविद्यालयातील मुलांच्या वसतिगृहाच्या आवारात जुने झाड दुपारी बाराच्या सुमारास कोसळले, यावेळी झाडाच्या खाली दोन मजूर स्वच्छतेचे काम करत होते. त्यातील एका मजुराच्या डोक्यात हे झाड कोसळले. काही प्राध्यापकांनी मजुरांना झाडाखालून काढण्याचा प्रयत्न केला. तसेच अग्निशमन दलासही याची माहिती देण्यात आली. त्यानंतर अग्निशमन दलाने ही माहिती जनता वसाहत केंद्रास कळविली. मात्र, त्यानंतर अग्निशमन दलाची गाडी आली नाही, तर दोन अधिकारी दुचाकीवरून पाहणी करण्यासाठी आले होते.
अधिकारी आले दुचाकीवर
दुचाकीवर आलेल्या अधिकाऱ्यांनी विश्रामबागवाडा क्षेत्रीय कार्यालयाच्या उद्यान विभागाच्या कर्मचाऱ्यांना फोनवर घटनेची माहिती दिली. तसेच खासगी जागा असल्याने आम्ही आतमध्ये जाणार नाही, असे सांगितले. त्यानंतर उद्यान विभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी करत आपला अहवाल तयार करत सोपस्कर पार पाडले.
दल प्रमुखांचा दावा
प्रत्यक्षात अशा घटनेची माहिती मिळाल्यानंतर अग्निशमन दलाचे अधिकारी बचाव वाहनासह जाणे अपेक्षित असताना अशा प्रकारे आधी दुचाकीवर जाऊन पाहण्याची कार्यपद्धत असल्याचा दावा महापालिकेच्या अग्निशमन दलाचे प्रभारी प्रमुख गणेश सोनुने यांनी केला आहे. मात्र, एखादे झाड खासगी जागेत कोसळले तर अग्निशमन दल बचाव कार्यास जाणार नाही का, याचे उत्तर मात्र त्यांना देता आले नाही.