विद्यापीठ चौकासह ई स्क्वेअर उड्डाणपूलही पाडणार
टाटा-सिमेन्ससह “पीएमआरडीए’ करणार करार
पुणे – गणेशखिंड रस्त्यावरील विद्यापीठ चौक आणि ई-स्क्वेअर चौकातील उड्डाणपूल पाडण्यास राज्य शासनाने मान्यता दिली आहे. त्याचबरोबर विद्यापीठ चौकात दुमजली पूल उभारण्यासाठी टाटा-सिमेन्स या दोन्ही कंपन्यांबरोबर करार करण्यास पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाला (पीएमआरडीए) परवानगी देण्यात आली आहे.
हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो प्रकल्पाचे काम “पीएमआरडीए’ने हाती घेतले आहे. त्यासाठी पुणे विद्यापीठ आणि ई स्क्वेअर चौकातील उड्डाणपूल अडथळा ठरत आहेत. त्यामुळे हे दोन्ही पूल पाडण्याचे नियोजन “पीएमआरडीए’कडून करण्यात आले आहे. तसा प्रस्ताव मान्यतेसाठी “पीएमआरडीए’ने राज्य सरकारच्या नगर विकास खात्याकडे पाठवला होता. तसेच हा पूल महापालिकेने बांधला आहे. तो पाडण्यासाठी पालिकेचे “ना हरकत प्रमाणपत्र’ आवश्यक आहे.
तसा प्रस्ताव “पीएमआरडीए’ने महापालिकेकडे पाठविला होता. लॉकडाऊनच्या काळात हे पूल पाडण्यास परवानगी द्यावी, अशी विनंती या प्रस्तावात होती. हे दोन्ही पूल पाडण्यास आणि तेथे नवीन पूल उभारण्यास राज्य सरकारने “पीएमआरडीए’ला मान्यता दिली आहे. त्याच बरोबरच नवीन पूल उभारण्यास टाटा-सिमेन्स या कंपनीबरोबर काम करण्यास राज्य सरकारने मान्यता दिली आहे. हे दोन्ही पूल पाडून तेथे उभारण्यात येणाऱ्या दुमजली उड्डाणपुलास सुमारे 260 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. हा सर्व खर्च “पीएमआरडीए’ करणार आहे. मेट्रो प्रकल्पाचे काम टाटा-सिमेन्स या कंपनीला यापूर्वीच देण्यात आले आहे. कंपनीने दुमजली पूल उभारण्याचे नियोजन केले आहे. त्यासाठी कंपनीला पूल पाडण्यासाठी शॉर्ट टेंडर काढण्याच्या सूचना दिल्याचे “पीएमआरडीए’ने सांगितले.
असा असेल नवीन पूल
या दोन्ही पुलांची मिळून लांबी एक किलोमीटर आहे. गणेशखिंड रस्त्यावर सध्या दररोज 22 हजार वाहने ये-जा करतात. त्यापैकी केवळ पाच हजार वाहने या पुलाचा वापर करत असल्याचे एका पाहणीत आढलून आले होते. आता नव्याने उभारण्यात येणाऱ्या दुमजली उड्डाणपुलाची लांबी ही 1.7 किलोमीटर असणार आहे. सर्वांत वरचा पूल मेट्रोसाठी असेल. तर खालील पुलावर बीआरटी आणि खासगी वाहने धावतील. नवीन उड्डाणपूल हा चौपदरी असेल.