लोणी काळभोर – येथील ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या पांडवकालीन महादेव मंदीरात शुक्रवारी ( दि. ५) दुपारी अचानक “नागराज” अवतरले, व त्यांनी थेट महादेवाच्या पिंडीला वेटोळे घालुन मंदीरात येणाऱ्या शेकडो भाविकांना दर्शन दिले आहे. त्यामुळे लोणी काळभोरसह परिसरात मोठ्या प्रमाणात नागराजाची जोरदार चर्चा आहे.
लोणी काळभोर ग्रामपंचायत हद्दीत पांडवकालीन महादेव मंदीर आहे. शुक्रवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास अचानकपणे मंदिरात नागराज अवतरले. यावेळी महादेव मंदीराचे विश्वस्त सुरेश पर्वतराव काळभोर यांना तो प्रथम दिसला. त्यांनी ही बाब मंदीरात येणाऱ्या भाविकांना दाखवली. त्यानंतर शेकडो भविकांनी नागराजांचे दर्शन घेतले. त्यामुळे सर्वत्र याची चर्चा सुरु झाली व चर्चेला उधाण आले.
आजुबाजुच्या गावात सोशल माध्यमावर फोटो व्हायरल झाले. लोकांनी महदेव मंदिरात पाहायला गर्दी करायला सुरुवात केली. महादेवाचा चमत्कार याच्या नावाखाली लोकांची गर्दी वाढत गेली. जितके लोक तेवढ्या कथा, तेवढे अनुभव चर्चेत येऊ लागले. त्यानंतर सर्पमित्राने नागराजांना पकडुन, शेजारील झाडीत सोडुन दिले.
लोणी काळभोर इथलं हे शिवालय पांडवकालीन असल्याचं बोललं जातं. सुमारे ५० वर्षांपूर्वी या मंदिराच्या आसपासच्या जागेची परिश्रमपूर्वक स्वच्छता आणि कायापालट करून मंदिराला प्रकाश झोतात आणण्याचं काम सुरेश पर्वतराव काळभोर ऊर्फ महाराज यांनी केलं. आजूबाजूच्या वृक्षांच्या लागवडीमुळे मंदिरांचा परीसर प्रेक्षणीय आहे. या मंदिरातलं शिवलिंग हे पांडवकालीन आहे. मंदिराच्या मुख्य गाभाऱ्याच्या दारात, लक्ष्मी नारायणाची त्या काळात कोरलेली मूर्ती हे या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणता येईल.
जिर्णोद्धाराच्या वेळी स्थापित केलेली नंदीची मूर्तीही, अखंडपणे एका दगडातून, कोरीव कामाने बनवलेली आहे. मंदिरासमोर सतत अग्नि पेटता ठेवलेला असतो. अशा वातावरणात नागराजाने भाविकांना दर्शन दिल्याने, लोणीकाळभोर परीसरात भाविकांमध्ये मंदीराबाबत श्रध्दा आणखीनच वाढली. हा व्हिडीओ अनेकांनी आपल्या सोशल मिडीयामधुन व्हायरलही केल्याचे दिसुन आले.