पुणे –दुचाकी भाडेतत्त्वावर घेऊन तिची परस्पर विक्री करणाऱ्या तिघांच्या टोळीला समर्थ पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. यातील एकाचा दुचाकी खरेदी विक्रीचा व्यवसाय आहे.
अरीश धवर (31, रा. पठारे वस्ती, लोहगाव, मूळ मुंबई), अंबरेश बिदनूर (33, पठारे वस्ती, लोहगाव, मूळ रा. कर्नाटक) आणि नरेंद्र पुरूड (37, रा. नानापेठ) अशी आरोपींची नावे आहेत. यातील नरेंद्र हा रास्तापेठ येथे नरेंद्र मोटर्स नावाने दुचाकी खरेदी-विक्री व्यवसाय करतो.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, “धानोरी येथील एका दुकानातून भाडेतत्त्वावर ई-बाइक देण्यात येतात. दि.16 ते 29 ऑगस्टपर्यंत या दुकानमालकाने तीन दुचाकी आठ दिवसांसाठी नानापेठ येथे भाडेतत्त्वावर दिल्या होत्या. परंतु, मुदत संपल्यानंतरही दुचाकी परत आल्या नाही. त्यामुळे दुकान मालकाने संबंधित व्यक्तीकडे फोनवर संपर्क केला असता, त्याने दुचाकी देण्यास टाळाटाळ करत उडवाउडवीची उत्तरे दिली.
नंतर त्यांचे फोनच बंद आले. त्यानंतर 29 ऑगस्ट रोजी तक्रारदारांनी समर्थ पोलीस ठाण्यात तक्रार दिली. तीनही दुचाकी नानापेठ परिसरात असल्याची माहिती पोलीस हवालदार रणजित उबाळे यांना मिळाली. त्यानुसार कारवाई करण्यात आली.