पुणे, दि. 5 -प्रभागासाठी “स’ यादी तसेच वॉर्डस्तरीय निधीतून निविदांसाठी रिंग करून विकासकामांच्या निविदा अवघ्या 1 ते 2 टक्के कमी दराने भरणारे ठेकेदार, यंदा हीच कामे चक्क 35 ते 40 टक्के कमी दराने करण्याच्या निविदा भरत आहेत. त्यामुळे महापालिकेची मोठी आर्थिक बचत होत आहे. प्रशासक कालावधीत ठेकेदारांच्या डोक्यावरून राजकीय “वजन’ बाजूला झाल्याने महापालिकेची कोट्यवधींचा निधी बचत होत आहे. तर अवघ्या 2 ते 3 लाखांच्या कामासाठी तब्बल 20 ते 22 ठेकेदार निविदा भरत असून हे काम ते 2 लाखांतही करण्यासही तयार आहेत. त्यामुळे गेल्या काही वर्षात अशाच प्रकारच्या कामांसाठी महापालिकेचे मोठे आर्थिक नुकसानही झाल्याचे या निमित्ताने समोर येत आहे.
“रिंग’ करून मिळविली जात होती कामे
नगरसेवकांच्या “स’ यादीसाठी अंदाजपत्रकात जवळपास 700 ते 800 कोटींचा निधी असतो. तर देखभाल दुरुस्तीच्या कामांसाठी क्षेत्रीय कार्यालयांना सुमारे 200 कोटींचा निधी दिला जातो. अनेक कामांसाठी नगरसेवकांना महापौरांच्या विशेष निधीतूनही निधी दिला जातो. अशी जवळपास 800 ते 1 हजार कोटींची 5 ते 20 लाखांपर्यंतची कामे क्षेत्रीय कार्यालये तसेच मुख्य खात्याकडून केली जातात. ही कामे करताना क्षेत्रीय कार्यालयाच्या अंतर्गत चार ते पाच ठेकेदार एकत्र येऊन निविदा भरतात. त्या अवघ्या 1 ते 2 टक्के कमी दराच्या अथवा 1 ते 2 टक्के जादा दराच्या भरतात. त्या भरताना ही कामे ठेकेदार वाटून घेण्याचे ठरवून भरतात. तर ही कामे भरण्यासाठी इतर कोणी पुढे आल्यास त्याला राजकीय हस्तक्षेपाची मदत घेऊन निविदा भरू दिली जात नाही. परिणामी, आलेल्या चार ते पाच निविदांमधूनच सर्वांत कमी दराची निविदा प्रशासनासला स्वीकारावी लागते. मात्र, यात निविदा रकमेच्या केवळ 1 ते 2 टक्के रक्कमच महापालिकेचा फायदा होत होता.
आता 35 टक्के कमी दराने तीच कामे
मार्च 2022 मध्ये महापालिकेची मुदत संपली असून एप्रिल 2022 पासून महापालिका आयुक्तांचे अंदाजपत्रक सुरू आहे. या अंदाजपत्रकात नगरसेवकांच्या “स’ यादीचा समावेश नाही. तसेच क्षेत्रीय कार्यालयाकडूनही केवळ अत्यावश्यक कामेच केली जात आहेत. त्यालाही महापालिका आयुक्त अध्यक्ष असलेल्या वित्तीय समितीची मान्यता बंधनकारक आहे. त्यामुळे 2022-23 या आर्थिक वर्षांत सर्वाधिक कमी निविदा निघाल्या आहेत. तर, महापालिकाच अस्तित्वात नसल्याने लोकप्रतिनिधींची मदतच घेता येत नसल्याने काम मिळविण्यासाठी ठेकेदार आता 30 ते 35 टक्के कमी दराच्या निविदा भरत आहेत. मागील वर्षी ज्या कामांसाठी क्षेत्रीय कार्यालयांच्या निविदा चार ते पाच ठेकेदारच भरायचे त्या कामांसाठी आता 20 ते 25 ठेकेदार निविदा भरत आहेत. त्यामुळे महापालिकेची विकासकामांवर 30 ते 35 टक्के बचत होत असल्याने पालिकेला त्याचा चांगलाच आर्थिक फायदा होत आहे.