सिंहगडरस्ता – वडगाव बुद्रुक येथे मनपाची कै.बबनराव नारायणराव जाधव शाळा क्रमांक 20 येथे शौचालयातील ड्रेनेज पाइप फुटल्यामुळे दुर्गंधी सुटली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना वर्गामध्ये बसणे कठीण झाले आहे. तर, अशा अस्वच्छतेत मुलांना शिकवायचे कसे? असा प्रश्न शिक्षक विचारत आहेत.
गेल्या अनेक वर्षांपासून या शाळेत हा त्रास सुरू आहे. पण, कमालीचे दुर्लक्ष केले जात आहे. दरम्यान, मनसेचे चंदन प्रभाकर कड यांनी मनपा आयुक्त आणि सिंहगड क्षेत्रीय कार्यालयाचे सहायक आयुक्त यांना पत्र लिहून या समस्येविषयी माहिती दिली आहे. विद्यार्थी आणि शिक्षकांनी अशी दुर्गंधी का सहन करावी? हा प्रशासनाचा हलगर्जीपणा आहे. ड्रेनेज पाइप तातडीने दुरुस्तीची मागणी त्यांनी केली आहे. कार्यवाही न झाल्यास आंदोलनाचा इशाराही त्यांनी दिला आहे.
“प्रभात’कडून सातत्याने पाठपुरावा
वडगाव भागामध्ये महानगरपालिकेच्या मालिकेच्या तीन इमारती बांधून तयार आहेत. परंतु, प्रशासकीय दिरंगाईमुळे अजून या सर्व शाळांचे स्थलांतर या नवीन वास्तूमध्ये होत नाही. दैनिक “प्रभात’ने याविषयी सातत्याने पाठपुरावा सुरू ठेवला आहे. आता प्रशासनाला कधी जाग येते, हे पाहवे लागणार आहे.
हरिदास चरवड यांचीही सूचना
शाळेतील गैरसोय आणि अस्वच्छतेबाबत माजी नगरसेवक हरिदास चरवड यांनीही या संदर्भात सिंहगड रस्ता क्षेत्रीय कार्यालयाचे सहायक आयुक्त प्रदीप आव्हाड यांच्याशी संपर्क साधून
दुरुस्ती करून देण्याची मागणी केली आहे.
प्रशासन म्हणते…
शाळेतील गैरसोयीबाबत संपर्क साधला असता, सिंहगड रस्ता क्षेत्रीय कार्यालयाचे सहायक आयुक्त प्रदीप आव्हाड
म्हणाले, “शाळेतील ड्रेनेज दुरुस्ती आणि अन्य देखभालीचे काम आजच हाती घेतले जाईल. विद्यार्थ्यांना शिक्षकांना कोणताही त्रास होणार नाही, याची पालिका प्रशासनाकडून नियमित काळजी घेतली जाईल.’