नवी दिल्ली – देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आई हिराबेन मोदी यांचे निधन झाले आहे. वयाच्या 100 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून हिराबेन यांच्यावर यूएन मेहता रुग्णालयात उपचार सुरु होते. आज पहाटे साडेतीन वाजता उपचारादरम्यान हिराबेन मोदी यांचे निधन झाले. दरम्यान, त्यांच्या निधनानंतर विविध स्तरातून शोक व्यक्त केला जात आहे.
आता बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणावत हिने देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आईच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून अभिनेत्रीने एक पोस्ट शेअर करत शोक व्यक्त केला आहे.
कंगनाने तिच्या इंस्टा स्टोरीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा त्यांच्या आईसोबतचा एक फोटो शेअर केला आहे. फोटो शेअर करत तिने लिहिलं आहे,”कठीण प्रसंगी देव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना संयम आणि शांती देवो, ओम शांती”. असं ती म्हणाली आहे.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आईच्या पार्थिवाला अग्नि दिला. हिंदू धर्माच्या पद्धतीनुसार हीरा बा यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. हीरा बा यांच्या पार्थिवाला अग्नि देण्यात आला तेव्हा अनेकांना अश्रू अनावर झाले. पीएम मोदी आणि त्यांच्या भावांनी आईच्या पार्थिवाला खांदा दिला आहे.