म्युझीकल फाउंटन अपग्रेडशनसाठी पालिका करणार तीन कोटींचा खर्च
पुणे – विद्युत विभागाने शहरातील बोलक्या झाडांसाठी काढलेली 88 लाखांची वादग्रस्त निविदा
चर्चेत असतानाच; महापालिकेच्या विद्युत विभागाकडून पर्वती दर्शन येथील वसंतराव बागुल उद्यानामध्ये 13 वर्षांपूर्वी बसवलेले म्युझीकल फाउंटन अपग्रेड करण्याच्या नावाखाली तब्बल 3 कोटींची निविदा काढली आहे. विशेष म्हणजे, महापालिकेकडे पथदिव्यांचे वीजबिल भरण्यासाठी पैसे नसल्याने शहरातील अनेक रस्ते अंधारात असतानाही या “आवाजाच्या कारंजावर उधळपट्टीचे तुषार उडविण्याची घाई महापालिका प्रशासन आणि नगरसेवकांना का, असा प्रश्न पुन्हा उपस्थित होत आहे.
महापालिकेच्या एस्टीमेट कमिटीने शिवदर्शन येथील वसंतराव बागुल उद्यानातील म्युझिकल फाउंटनमध्ये मल्टिमीडिया वॉटर स्क्रीन शोद्वारे बांग्लादेश निर्मितीनिमित्त भारत पाकिस्तानमध्ये झालेल्या युद्धावर आधारीत भारताची शौर्य गाथा देखावा उभा करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी 2 कोटी 90 लाख रुपयांचे एस्टिमेट तयार करताना देखभाल दुरुस्तीच्या खर्चाचाही अंतर्भाव करण्यात आला आहे. प्रत्यक्षात निविदा याहून अधिक दराची येण्याची शक्यता आहे. या प्रकल्पासाठी विद्युत विभागाने निधी उपलब्ध करून दिला आहे. त्यामुळे महापालिकेत नक्की काय सुरू आहे आणि त्याकडे प्रशासन लक्ष देणार का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
शहर अंधारात; पण खर्चाची घाई
महावितरणकडून गेल्या काही दिवसांपासून शहरातील थकित वीजबिलपोटी महापालिकेच्या मिळकती तसेच पालिकेच्या पथदिव्यांचा वीजपुरवठा खंडीत केला आहे. महापालिका प्रशासनाकडून वारंवार विद्युत विभागास आवश्यक असलेला निधी वर्गीकरणाद्वारे दिला जात असतानाही पैसे नसल्याने पालिकेवर ही वेळ ओढावली आहे. मात्र, अशा स्थितीत विद्युत विभागाकडून निधी खर्चासाठी प्राधान्य न ठरविता वाटेल तशा निविदा काढल्या जात आहेत. त्याचाच आणखी एक प्रकार या निमित्ताने समोर आला आहे.