पुणे महापालिकेतील दिव्यांगांची लिफ्ट पुन्हा सुरू

दै. “प्रभात’च्या वृत्तानंतर प्रशासनाला जाग


सकाळी 7 ते रात्री 8 पर्यंत सुरू ठेवणार

पुणे – महापालिकेतील चोरीचे कारण देत नवीन विस्तारीत इमारतीमधील बंद करण्यात आलेली दिव्यांगांसाठीची स्वतंत्र लिफ्ट पुन्हा सुरू करण्यात आली आहे. दैनिक “प्रभात’ने ही लिफ्ट बंद ठेवण्यात आल्याचा प्रकार समोर आल्यानंतर खडबडून जागे झालेल्या पालिका प्रशासनाने तातडीने ही लिफ्ट सुरू केली आहे. मात्र, ही लिफ्ट मर्यादीत वेळेतच सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला असून तशी सूचना या ठिकाणी लावण्यात आली आहे.

मागील आठवड्यात पालिकेच्या विस्तारीत इमारतीत चोरीचा प्रकार घडला होता. यात स्वच्छतागृहातील सुमारे 20 नळ, हॅन्डफ्लश, फायर ब्रिगेडचे हॉजपाईप तसेच आठ ते दहा पितळी नॉझलसह एक सीसीटीव्हीही चोरीला गेला आहे. या इमारतीत वारंवार असे प्रकार घडत असतानाही प्रशासनाने त्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष केले आहे. त्यातच, या इमारतीसाठी सुरक्षारक्षक असतानाही हे प्रकार होत असल्याने सुरक्षा व्यवस्थेवरच प्रश्‍नचिन्ह उपस्थित झाले आहेत. असे असतानाच सुरक्षा व्यवस्था सक्षम करण्याऐवजी सुरक्षा विभागाकडून ही चोरी करण्यासाठी चोरट्यांनी दिव्यांगांसाठी उभारण्यात आलेली लिफ्ट वापरली आहे. ही लिफ्ट इमारतीच्या प्रवेशद्वारावर असलेल्या सुरक्षा रक्षकांच्या निदर्शनास येत नाही. त्यामुळे ती बंद करण्याची मागणी विद्युत विभागाकडे केली.

तसेच, विद्युत विभागाकडून काही निर्णय होण्याआधीच या सुरक्षा रक्षकांनीच ती परस्पर बंद केली आहे. त्यामुळे पालिकेत आलेल्या दिव्यांगांची अडचण झाली होती. त्यातच या विस्तारीत इमारतीला दिव्यांगांसाठी रॅम्प उभारण्यात आलेला नाही. मात्र, स्वतंत्र लिफ्ट असून तिथपर्यंत जाण्यासाठी रॅम्पची सोय आहे. त्यामुळे याचा वापर सुरू होता. मात्र, आता चोरीचे कारण देत ही लिफ्टही बंद ठेवण्यात आली. ही बाब दै. “प्रभात’ने समोर आणल्यानंतर बुधवारपासून ही लिफ्ट पुन्हा सुरू करण्यात आली आहे. ही लिफ्ट सुरू करताना प्रशासनाने त्या ठिकाणी सूचना फलक लावलेले असून सकाळी 7 ते रात्री 8 या वेळेतच ही लिफ्ट सुरू राहणार आहे. रात्रीनंतर त्याचा गैरवापर होण्याची शक्‍यता असल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचे भवन विभागाकडून सांगण्यात आले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.