पुणे – महापालिकेच्या बांधकाम विभागापाठोपाठ मिळकतकर विभागानेही विक्रमी कमाई केली आहे. 2021-22 या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तीन महिन्यांत महापालिकेच्या तिजोरीत तब्बल 1 हजार 303 कोटींचा महसूल जमा झाला आहे. सुमारे सात लाख 71 हजार मिळकतधारकांनी हा कर जमा केल्याची माहिती मिळकतकर संकलन विभागाचे प्रमुख विलास कानडे यांनी दिली.
गेल्या दोन वर्षांपासून महापालिकेच्या उत्पन्नाचे स्त्रोत घटले आहेत. त्या पार्श्वभूमीवर मागील दोन वर्षांपासून मिळकतकर वसुलीसाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत. त्यात, कर आकारणी न झालेल्या मिळकतती शोधणे, वापरात बदल झालेल्या मिळकती शोधणे, कर न भरणाऱ्या मिळकती सील करणे तसेच नियमित कर वसुलीसाठी प्रयत्न करणे यामुळे महापालिकेच्या मिळकतकर विभागाचा कर वाढण्यास मदत झालेली आहे.
त्यात, गेल्या दहा दिवसांत सुमारे 1,300 मिळकती सील करण्याची कारवाई सुरू केली आहे. त्यामुळे मागील महिनाभरात सुमारे 100 कोटींचा महसूल जमा झाला आहे. तर, या नऊ महिन्यांत सुमारे 47 हजार नवीन मिळकतींची कर नोंदणी झाल्याने सुमारे 334 कोटींचा महसूल मिळाला आहे. तर, वापरात बदल केलेल्या 51 हजार मिळकती शोधल्या असून त्याद्वारेही 114 कोटींचा महसूल तिजोरीत मिळकतकराच्या रूपाने जमा झाला आहे. तर, आर्थिक वर्षाच्या शेवटच्या तीन महिन्यांतही जास्तीत जास्त कर वसुलीचे उद्दिष्ट असल्याचे कानडे यांनी सांगितले.