पुणे- महापालिकेकडे ठेकेदारांनी अनामत रकमेपोटी जमा केलेली रक्कम पालिकेकडून राष्ट्रीयकृत बॅंकामध्ये मुदत ठेवींमध्ये गुंतविण्यात येते. मात्र, करोनामुळे उद्भवलेल्या आर्थिक संकटामुळे बॅंकाकडून मुदत ठेवींवर 4 ते 5 टक्केच व्याज मिळत आहे. त्यामुळे, महापालिकेने आपला गुंतवणूक पॅटर्न बदलण्याचा निर्णय घेतला असून महापालिका आता मुदत ठेवीं ऐवजी शासकीय कर्जरोख्यांमध्ये (बॉण्ड) गुंतवणूक करणार आहे. या गुंतवणूकीतून महापालिकेस 2 ते अडीच टक्के जादा व्याजाची अपेक्षा असून जवळपास 1 हजार कोटींची गुंतवणूक करण्याची तयारी महापालिका प्रशासनाने केली आहे. त्याचा, आराखडा तयार करण्यात येत असून त्या बाबत लवकरच अंतीम निर्णय घेतला जाणार आहे. पालिकेच्या 700 कोटी रुपयांच्या ठेवी राष्ट्रीयकृत बॅंकेत ठेवण्यात येणार असून त्याबाबतचे 210 कोटी आणि 490 कोटींच्या रकमेचे दोन प्रस्ताव स्थायी समितीत ठेवण्यात आले आहेत.
महापालिकेने 1979 मध्ये धोरणात्मक निर्णय घेत 70 टक्के रक्कम स्थायी समितीने शिफारस केलेल्या बॅंकेत गुंतवायची तर 30 टक्के आयुक्तांना गुंतविण्याचे अधिकार दिले होते. त्यानुसार, दरवर्षी ही रक्कम गुंतविली जाते. मात्र, 2020 मध्ये राज्यशासनाने ही रक्कम राष्ट्रीयकृत बॅंकेतच गुंतविण्याचे आदेश दिले आहेत.
मात्र, सध्या महापालिकेची स्थायी समिती अस्तित्वात नाही तसेच आयुक्तांकडे प्रशासकाचा भार आहे. तर महापालिकेच्या सुमारे 650 कोटींच्या मुदतठेवीची मुदत संपली आहे. त्यामुळे ही रक्कम पुन्हा गुंतविण्यासाठी सर्व अधिकार आयुक्तांना देण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. त्यामुळे आयुक्तांना अधिकार मिळाल्यानंतर आयुक्तांच्या अधिकारात उत्पन्न मिळवून देऊ शकणाऱ्या कर्जरोख्यांमध्ये हे पैसे गुंतविले जाण्याची शक्यता आहे.
गुंतवणुकीचे सर्व अधिकार आयुक्तांना
महापालिकेकडून शहरात दरवर्षी कोट्यवधी रुपयांची भांडवली कामे केली जातात. तसेच शहरात महापालिकेचे काही मोठे प्रकल्पही सुरू आहेत. या प्रकल्पांच्या तसेच विकासकामां पोटी ठेकेदार महापालिकेकडे अनामत रक्कम भरतात. अनेक वेळा प्रकल्पाचे काम मोठे असल्याने तसेच महापालिकेत भविष्यात इतर कामेही मिळवायची असल्याने ठेकेदार ही अनामत रक्कम पालिकेकडेच ठेवतात. त्यामुळे, महापालिका ही रक्कम बॅंकांमध्ये जमा करते.
महापालिका प्रशासनाकडून शहराच्या विकासासाठी वेगवेगळे प्रकल्प हाती घेतले जात आहेत. त्या अंतर्गत उत्पन्नाचे नवीन स्त्रोत ठरविले जात आहेत. अनेक ठेकेदारांच्या सुरक्षा ठेव, तसेच महापालिकेकडील रक्कम मुदत ठेवीत गुंतवणूक केली जाते, पण आता ही रक्कम शासकीय कर्जरोख्यात गुंतवल्यास त्यातून जास्त परतावा मिळू शकतो. त्यामुळे साधारणपणे 1 हजार कोटीची रक्कम टप्याटप्प्याने गुंतवली जाणार आहे.
– विक्रम कुमार, आयुक्त, महापालिका