पुणे – करोना संकटकाळात पुणे महापालिका प्रशासनाने पाठवलेल्या (रेफर) करोनाबाधित रुग्णांवरील उपचारांच्या खर्चापोटी 50 कोटी रुपयांची थकबाकी तातडीने द्यावी, अशी मागणी खासगी रुग्णालयांनी केली आहे.
शहरातील खासगी रुग्णालयांची संघटना “पुणे हॉस्पिटल असोसिएशन’ने या संदर्भात महापालिका आयुक्तांना पत्र दिले आहे. या पत्रात शहरातील नऊ प्रमुख खासगी रुग्णालयांनी महापालिका प्रशासनाने पाठवलेल्या करोना रुग्णांवरील उपचारांच्या खर्चापोटी 50 कोटी रुपयांची थकबाकी देण्याची मागणी केली आहे. ही थकबाकी न दिल्यास रुग्णांना उपचार सेवा देणे अवघड होईल, अशी भीती व्यक्त केली जात आहे.
यापैकी अनेक रुग्णालये धर्मादाय रुग्णालये आहेत. करोनाचे संकट तीव्र असताना वाढत्या रुग्णसंख्येला सामावून घेण्यात सरकारी रुग्णालयातील खाटा अपुऱ्या पडल्या होत्या. त्या वेळी महापालिकेने गरीब, गरजू रुग्णांना छोट्या-मोठ्या खासगी रुग्णालयांकडे उपचारांसाठी पाठवले होते. या उपचारांचा खर्च महापालिकेने अद्याप दिलेला नाही. त्यामुळे खासगी रुग्णालयांची कोंडी होत आहे.
करोनाबाधितांवरील उपचारांच्या खर्चाची थकबाकी देण्यासाठी महापालिकेला वारंवार पत्रे, स्मरणपत्रे दिली आहेत. थकबाकी मिळत नसल्याने छोट्या रुग्णालयांना व्यवस्थापन करताना अडचणी येत आहेत.
– बोमी भोट, अध्यक्ष, “पुणे हॉस्पिटल असोसिएशन’