पिंपरी – शहरातील दोन तरुणांनी एक विशिष्ट कोन मापक (अँगल मेजरिंग डिवाइस) बनविले आहे. या वैशिष्ट्यपूर्ण कोन मापक यंत्राचे पेटेंटही त्यांना मिळाले आहे.
वाकड येथील प्रितेश जैन व समीर डोंबे या दोन यांत्रिकी अभियंत्यांनी हे कोन मापक तयार केले आहे. प्रितेश जैन हे टाटा टेक्नॉलॉजीस पुणे येथे रिसर्च अँड डेव्हलपमेंट विभागात कार्यरत आहेत. तर समीर डोंबे यांनी स्वतःचा उद्योग सुरू केला आहे. महाविद्यालयामध्ये अभियांत्रिकीची पदवीचे शिक्षण चालू असतानाच साल 2011 मध्ये प्रितेशच्या मनात विविध कोनाने, विविध पातळीवरून, विविध दिशेने, कोन मोजण्याचे व अत्यंत सूक्ष्म व तंतोतंत कोन मापक यंत्र बनवण्याची कल्पना आली.
जे अभियांत्रिकी आणि इलेक्ट्रॉनिक्स या दोन्ही पद्धतीने कोनाची गणना करू शकेल, यंत्र बनविण्याच्या दिशेने वाटचाल सुरू करत यंत्र बनविण्यात यश प्राप्त झाले. सदर कोन मापक यंत्राद्वारे 0 अंश ते 360 अंश कोन मोजता येऊ शकते. या यंत्रातील अभियांत्रिकी पद्धतीचा वापर करून 0.5 मिनिट ( 0.008 अंश ) पर्यंत, तर इलेक्ट्रॉनिक्स पद्धतीने पद्धतीचा वापर करून 1 सेकंद ( म्हणजे 0.0002 अंश ) इतक्या सूक्ष्म अंशाचा कोनापर्यंत गणना करता येऊ शकते. सदर यंत्र कुठल्याही व कशाही (समतल, वरखाली, तिरपा, इत्यादी) पृष्ठभागांवर वापरता येऊ शकते. या यंत्रात वर खाली आणि मागे पुढे करण्याची व्यवस्था आहे. उपरोक्त सर्व सुविधा असल्याने हे नवीन यंत्र हाताळण्यास अत्यंत सोपे व सुलभ असल्याचे बोलले जात आहे.
सप्टेंबर 2012 मध्ये बौद्धिक संपदा विभाग भारत सरकारकडे या यंत्राचे पेटंट प्राप्तीसाठी संचिका दाखल करण्यात आली. यानंतर आठ वर्षांचा पाठपुरावा आणि बौद्धिक संपदा विभागाचे सर्व निकष व इतर सर्व बाबी पूर्ण करून डिसेंबर 2020 मध्ये पेटंट प्राप्त करण्यात त्यांना यश मिळाले.
त्यांच्या या यशाबद्दल आरोग्यमंत्री मंत्री राजेश टोपे, विक्रम वाघमारे, कस्टम्स अधीक्षक देवेंद्र बाकलीवाल, जैन तत्वज्ञ हेमंत काला, वाकड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. विवेक मुगळीकर, श्री फाऊंडेशनचे सुशांत पांडे, सोलापूरचे उपविभागीय अधिकारी प्रभाकर शिंदे, विश्वकर्मा इन्स्टिट्यूट्सचे प्राध्यापक वृंद, नेमीचंद जैन, पुणे विद्यापीठाचे प्रा. दीपक माने आदींनी यांचे कौतुक व अभिनंदन केले आहे.