अद्ययावत यंत्रणा नाहीच; कचऱ्याचे राजरोस डंपिंग सुरुच
फुरसुंगी – फुरसुंगी-उरुळी कचराडेपोबाबत पुणे मनपाचा दावा खोटा ठरला आहे. वर्गीकरण न केलेल्या कचऱ्याचे डंपिंग राजरोसपणे सुरुच आहे. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. यातून शहरात पुन्हा एकदा कचराकोंडी होणार हे अटळ आहे.
राष्ट्रीय हरित लवादाच्या निर्देशानुसार दि. 31 डिसेंबर 2019नंतर फुरसुंगी-उरुळी डेपोवर कचऱ्याचे डंपिंग न करण्याबाबत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळास दोन कोटींच्या बॅंक गॅरंटीसह प्रतिज्ञापत्र करून देणारी पुणे महानगरपालिका दि. 1 जानेवारी 2020 पासून कचरा डंपिंग होत नसल्याबाबत खोटा दावा करीत असल्याचा आरोप कचरा डेपो संघर्ष समितीने केला आहे.
स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेचे परिक्षण करण्याकरिता केंद्र सरकारची टिम पुण्यात येत आहे, या स्पर्धेत प्रथम येण्याकरिता पुणे शहर रोज चकाचक करण्याचा आटोकाट प्रयत्न सुरु असताना दुसऱ्या बाजूला हरित लवादाला कचरा टाकण्याकरिता प्रतिज्ञापत्राद्वारे मागितलेली मुदत संपली आहे. तरी फुरसुंगी कचरा डेपोमध्ये अद्यापही रोज वर्गीकरण न केलेला अंदाजे 600 ते 700 टन कचरा, बंद पडलेल्या हंजर कंपनीच्या शेडमध्ये तसेच त्याठिकाणी सुरु असणाऱ्या बायो मायनिंगच्या प्रकल्पामध्ये डंपिंग करित असल्याचे निदर्शनास आले आहे.
आज, कचराडेपो हटाव संघर्ष समितीने याबाबत पाहणी केल्यानंतर वरील प्रकार उघडकीस आला. अशाप्रकारे पुणे मनपाच्या संबंधित अधिकाऱ्यांद्वारे शासनाच्या आदेशाचा वारंवार अवमान करून नागरिकांची व न्यायव्यवस्थेची दिशाभूल करण्याची परंपरा यापुढेही चालू आहे. तरी याबाबत ग्रामस्थांशी चर्चा करून आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यात येईल, अशी माहिती कचरा डेपो संघर्ष समितीने दिली आहे.
11 गावांसाठी कचरा वाहन खरेदीस मान्यता
महापालिका हद्दीत समाविष्ट 11 गावांमधील कचरा संकलनासाठी 7 बीआरसी वाहने खरेदी करण्यास मंगळवारी झालेल्या स्थायी समिती बैठकीत मान्यता देण्यात आली. त्यासाठी 3 कोटींच्या खर्चास मान्यता देण्यात आली आहे. 2019-20 च्या अंदाजपत्रकात या कामासाठी सुमारे साडेतीन कोटींच्या निधीची तरतूद होती. या तरतूदीमधून हा खर्च होणार आहे. 11 गावांमधून दररोज सुमारे 300 ते 400 टन कचरा संकलीत होतो. मात्र, ही गावे समाविष्ट झाल्यानंतर पालिकेकडे असलेल्या वाहनांचाच कचरा संकलनासाठी वापर केला जात असल्याने यंत्रणेवर ताण येत होता.
तसेच, गावांमधील कचरा नियमितपणे उचलला जात नव्हता. त्यामुळे या गावांसाठी स्वतंत्र बीआसी खरेदी होणार असल्याने कचरा संकलन आणि वाहतुकीची समस्या सुटणार आहे. फुरसुंगीला टॅंकरसाठी 1 कोटी उरूळी देवाची येथील महापालिकेच्या कचरा डेपोमुळे फुरसुंगी येथील पाण्याचे जलस्त्रोत प्रदूषीत झाले आहे. त्यामुळे या गावांना दररोज 100 टॅंकरच्या फेऱ्यांद्वारे पाणी देण्यासाठी 99 लाख रुपयांच्या खर्चासही मान्यता दिली. या गावांना स्वतंत्र पाण्याचा स्त्रोत नसल्याने पालिकेकडून गेल्या अनेक वर्षांपासून हा पाणीपुरवठा केला जात आहे. त्यासाठीची निविदा संपल्याने या नवीन खर्चास मान्यता दिली आहे.