शहरातील रस्ते दुरुस्तीवर 300 कोटी खर्च केल्यानंतरही रस्त्यांवर खड्डे
पुणे – शहरात एक-दोन तास पाऊस पडल्यानंतर काही रस्त्यांवरील खड्ड्यांनी लगेच “डोके’वर काढले तसेच अनेक भागात पाणी साचल्याने वाहतूक कोंडी होणे, वाहने संथगतीने चालण्याचे प्रकार घडले यामुळे रस्त्यांच्या कामांसाठी त्यातही खड्डे बुजविण्याकरिता 300 कोटींचा खर्च केल्याचा महापालिका प्रशासनाकडून करण्यात येत असलेला दावा खोटा ठरत आहे.
शहरासह उपनगरांतील नागरिकांना यावर्षी पावसाळ्यात आणि त्यानंतरही रस्त्यांवरील खड्ड्यांचा मोठा त्रास झाला. गल्लीबोळातील रस्त्यासह मोठ्या रस्त्यापर्यंत सर्वच ठिकाणी खड्डे, डांबरीकरणाचे ओबडधोबड पॅच, खडी पसरल्याने धोकादायक झालेले रस्ते अशी स्थिती होती काही ठिकाणी ती आजही पहायला मिळते.
अगदी तासभर पाऊस झाला तरी प्रशासकीय काम उघडे पडते. शहरात 12 मीटरपेक्षा कमी रुंदीच्या रस्त्यांची लांबी जवळपास एक हजार किलोमीटर असताना त्यांच्या दुरुस्तीसाठी क्षेत्रीय कार्यालयांना केवळ 35 कोटी रुपये दिले गेले यातून दर्जेदार काम कसे होणार? याचे उत्तर महापालिका प्रशासनाकडेच आहे. त्यातही यंदाच्या अर्थसंकल्पातील तरतुदीपैकी केवळ 30 टक्केच निधी रस्त्यांच्या कामावर खर्च करण्यात आल्यानेच रस्त्यांची वाताहत झाल्याचे माजी नगरसेवक सांगतात.
कामाच्या विभागणीतून स्थिती उघड…
पुणे शहरात सुमारे 1400 किलोमीटरच लांबीचे रस्ते आहेत. 12 मीटरपेक्षा कमी रुंदीच्या रस्त्यांची लांबी तब्बल 970 किलोमीटर इतकी आहे.प्रशासनाच्या कामाच्या स्वरूपानुसार 12 मीटरपेक्षा कमी रुंदीचे रस्ते क्षेत्रीय कार्यालयाच्या अंतर्गत येतात. 12 मीटरपेक्षा रुंदीचे रस्ते हे पथ विभागाकडे येतात, अशा विभागणीमुळे कामाच्या स्वरूपात, गुणवत्तेमध्ये प्रचंड मोठी तफावत झाल्याची स्थिती उघड आहे.
नगरसेवक असताना…
शहरात समान पाणीपुरवठा योजनेच्या कामासाठी जलवाहिनी टाकण्यासाठी लहान-मोठे रस्ते खोदण्यात आले हे खोदलेले रस्ते संबंधित ठेकेदार दुरुस्त करणार असल्याने त्याच्या गुणवत्तेसह कामाच्या पद्धतीकडे पथ विभागाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष केले. त्यामुळे रस्ते दुरुस्त झाल्यानंतर एका समान पातळीत रस्ता न येता उंचवटा निर्माण होणे, रस्ता खचणे, सिमेंट निघून जाणे असे प्रकार घडत आहेत. महापालिकेत नगरसेवक असताना खड्ड्यांवरून आंदोलने होत होती अगदी मुख्य सभेत प्रश्न विचारले जात असल्याने कामाचा दर्जा राखला जात होता.