नगर – जिल्ह्यात गेल्या सहा दिवसांपासून मराठा कुणबी, कुणबी मराठा, तसेच कुणबी जातीचे पुरावे शोधण्याची मोहीम युद्धपातळीवर सुरू आहे. सर्व विभागाकडून दिवस रात्र या मोहिमेवर काम करण्यात येत आहे. विशेष म्हणजे आज धनत्रयोदशीची सुट्टी असतांनाही प्रशासनाकडून कामकाज सुरू होते. या सहा दिवसांत सर्व विभागाकडून तब्बल 46 लाख कागदपत्रांची तपासणी करण्यात आली असून त्यातून 85 हजार कुणबीच्या नोंदी आढळून आल्या आहेत.
महसूल, पोलिस यंत्रणा, खरेदी-विक्री दस्तऐवज,नगर शहरातील वस्तुसंग्रहालय, जन्म-मृत्यूच्या नोंदीच्या, शाळेतील दाखल्यांचे रेकॉर्ड यांचा शोध संबंधित यंत्रणेकडून सुरू आहे. यात मोठ्या प्रमाणात कुणबी नोंदी सापडण्याची शक्यता आहे. जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी अतिरिक्त जिल्हाधिकारी सुहास मापारी यांच्या अध्यक्षतेखाली कक्ष स्थापन केला असून, निवासी जिल्हाधिकारी राजेंद्र पाटील या कक्षाचे सदस्य सचिव आहेत. या समितीमध्ये जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी, प्राथमिक व माध्यमिक चे शिक्षणाधिकारी, व सहायक आयुक्त (नगरपालिका प्रशासन), तालुकास्तरावर तहसीलदार व गटविकास अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे.
85 हजार कागदपत्रात 1967 पूर्वीच्या कुणबी नोंदी आढळून आल्या आहेत. अशी माहिती कक्षाचे उपजिल्हाधिकारी अतुल चोरमारे यांनी दिली. अद्यापि कागदपत्रांची छाननी सुरू आहे. विविध विभागांच्या तपासणीत आढळलेल्या नोंदी जिल्हा कक्षाकडे पाठवल्या जात आहेत. जिल्हा कक्षाकडून त्याचे स्कॅनिंग करून प्रमाणीकरण केले जाणार आहे. त्यानंतर त्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केल्या जाणार आहेत.
जात पडताळणी समितीकडून 21 नोव्हेंबर 2016 पासून म्हणजे ही समिती जिल्ह्यात सुरू झाल्यापासून आजपर्यंत 52 हजार 677 कुणबी दाखले वितरित केले आहेत. अशा प्रकारे जिल्हा प्रशासनाकडे आतापर्यंत 56 हजार 688 जणांच्या कुणबी प्रमाणपत्राच्या नोंदीची माहिती प्राप्त झाली आहे. मोठ्या प्रमाणात नोंदी सापडण्याची शक्यताजात पडताळणी समितीने आतापर्यंत 52 हजार 677 कुणबी दाखले दिलेले आहेत. मात्र, इतर ठिकाणीही अजून बऱ्याच नोंदी सापडत आहेत.
1815 मधील सर्वांत जुनी नोंद सापडली
नगर तालुक्यातील बायजाबाई जेऊर येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळा ब्रिटिशकालापासून अस्तित्वात आहे. या शाळेच्या दप्तरात जनरल रजिस्टरमध्ये कुणबी जातीची नोंद आढळून आली आहे. सर्वात जुनी नोंद, 1815 मधील नोंद नगर शहराजवळील बायजाबाई जेऊर (ता. नगर) शाळेत आढळून आली आहे. जनरल रजिस्टरमध्ये शाळेत विद्यार्थी प्रवेश घेताना त्याची जात, जन्मतारीख व आई-वडिलांचे नाव आदी नोंदी केल्या जात. त्यामध्ये मोडी भाषेत ‘कुणबी’ नोंद आढळून आली.