नगर -दिवाळीत घरोघरी तयार केल्या जाणाऱ्या फराळाबरोबर मिठाईमध्ये प्रामुख्याने सुका मेवा वापरला जातो. मात्र, सुक्या मेव्यातील पिस्ता, खारीकच्या दरात प्रतिकिलो मागे 100 ते 200 रुपयांनी वाढ झाली आहे. त्यामुळे यंदा आप्तेष्ट, शासकीय तसेच खासगी कंपन्यांमधील कर्मचाऱ्यांना भेट म्हणून देण्यात येणाऱ्या सुक्या मेव्यासाठी ग्राहकांच्या खिशाला कात्री लागणार आहे.
दिवाळीत नातेवाईक, आप्तेष्टांना भेटवस्तू देण्यासाठी काजू, बदाम, अंजीर इत्यादींनी भरलेल्या आकर्षक बॉक्समध्ये मिळालेला सुका मेवा अनेक जण घेतात. मात्र, यंदा सुका मेवा बाजारात चांगलाच भाव खाणार आहे. कारण सुक्या मेव्यातील बदाम, काजूचे दर जरी स्थिर असले तरी पिस्ता, खारीकचे दर प्रतिकिलो 100 ते 200 रुपयांनी वाढल्याने नागरिकांना यासाठी आता अतिरिक्त पैसे मोजावे लागणार आहे.
सध्या कार्यालय व कंपन्यांकडून कर्मचाऱ्यांना सुका मेवा भेट देण्याचे प्रमाण वाढू लागले आहे. दिवाळीपूर्वी सुक्या मेव्याच्या गिफ्ट पॅकेटची मागणी वाढू लागली आहे. दिवाळीत आरोग्याची काळजी घेत मिठाईपेक्षा सुक्या मेव्याला नागरिकांकडून अधिक पसंती दिली जाते. अवघ्या काही दिवसांवर आलेल्या ऐन दिवाळी सणामुळे बाजारपेठे विविध वस्तूंनी सजली आहे. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी व्यापारी वर्गाने चांगली तयारी केली असल्याचे बाजारात दिसत आहे.
प्रकार आधीचे दर वाढलेले दर
काजू 650 ते 800 यंदा 700 ते 1200, बदाम 700 ते 1000 यंदा 900 ते 1200, पिस्ता 800 ते 1400 यंदा 9500 ते 1800, अक्रोड 700 ते 1300 यंदा 800 ते 1500, खारीक 130 ते 350 यंदा 140 ते 450, खजूर 90 ते 120 यंदा 100 ते 180, मनुका 90 ते 160 यंदा 100 ते 250