पुणे – वायव्य आणि पश्चिम बंगालच्या उपसागरावर तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याचे रुपांतर आता चक्रीय स्थितीत झाले आहे. आता ते वायव्य दिशेला हळूहळू सरकण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यात मान्सून पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता आहे. पुढील 24 तासात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तर पुणे जिल्ह्यात हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.
येत्या 48 तासांत राज्यातील कोकण परिसरात तुरळक ठिकाणी मुसळधार, तर मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार तर काही भागात मेघगर्जनेसह विजांची कडकडाटासह पावसाची शक्यता वतर्वण्यात आली आहे. राज्यात 8 ते 10 सप्टेंबर काळात “यलो अलर्ट’ देण्यात आला आहे.
कोकण-गोवा तसेच मध्य महाराष्ट्रासह मराठवाडा आणि विदर्भाला दि. 10 सप्टेंबरनंतर काही भागात मध्यम तर काही भागात मुसळधार पावसाची शक्यता पुणे वेधशाळेने वर्तवली आहे. मागील तीन ते चार दिवसांपासून शहरात पुन्हा उन्हाचा चटका वाढलेला आहे. बुधवारी (दि. 6) शहरातील कमाल तापमान 30 अंशांच्या पुढे नोंदविण्यात आले. त्यामुळे दिवसभर उकाडा आणि रात्री गारवा असे वातावरण शहरात पुणेकर अनुभवत आहेत.