पुणे – गोळीबाराची खोटी फिर्याद देऊन व्यावसायिकाकडून खंडणी उकळणाऱ्या कोंढव्यातील गुंड आसिफ खान याच्यासह पाच साथीदारांच्या विरोधात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मोक्का) कारवाई करण्याचे आदेश पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी दिले. असिफ खान स्वत:ला एका मंत्र्याचा भाचा असल्याचे सांगत होता. तसेच तो पोलिसांसाठी “सेटलमेंट’ची कामे करत असल्याचे भासवायचा.
या प्रकरणी आसेफ उर्फ आसिफ इस्माइल खान (23), इरफान हसन भोला (25, सध्या रा. जनता वसाहत, पर्वती, मूळ रा. विजापूर, कर्नाटक), शहाबाज मेहमूद खान (50), समीर मेहबूब शेख (36), फरियाज हसनखान पठाण (32, तिघे रा. संतोषनगर, कात्रज) यांच्या विरोधात कारवाई करण्यात आली आहे.
आसिफ खान याच्या विरोधात औरंगाबाद, चंदननगर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. खान याने बोपदेव घाटात गोळीबार झाल्याची फिर्याद पोलिसांकडे दिली होती. त्याने एका व्यावसायिकावर संशय व्यक्त केला होता. या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी देऊन त्याने व्यावसायिकाकडून खंडणीही उकळली होती.
गुन्हे शाखेने केलेल्या तपासात खान याने खोटी फिर्याद दिल्याचे उघडकीस आले. या टोळीविरोधात मोक्का कारवाईचा प्रस्ताव चंदननगरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र लांडगे, गुन्हे शाखेचे निरीक्षक जगन्नाथ जानकर यांनी तयार केला होता. संबंधित प्रस्ताव त्यांनी अतिरिक्त पोलीस आयुक्त नामदेव चव्हाण, उपायुक्त शशिकांत बोराटे यांच्याकडे पाठविला होता.