पुणे – पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) हाती घेतलेल्या म्हाळुंगे-माण टीपी स्कीमचा आराखडा राज्य सरकारकडे अंतिम मान्यतेसाठी सादर करण्यात आला आहे. पीएमआरडीएने पहिल्याच टप्प्यात चार वर्षांपूर्वी सुमारे २५० हेक्टर वरील म्हाळुंगे-माण टीपी स्कीमचे काम हाती घेतले होते.
या हाय टेक सिटीचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते धुमधडाक्यात उद्घाटन करण्यात आले होते. या स्कीमला सर्व प्रकारच्या मान्यता मिळाल्या होत्या तसेच हरकती-सूचनांवर सुनावणी घेऊन भूखंडाचे वाटपही पीएमआरडीएकडून निश्चित करण्यात आले होते.
परंतु, या टीपी स्कीम करताना मुळा आणि मुठा नदीची पूररेषा दर्शविण्यात आली नव्हती. दरम्यान, जलसंपदा विभागाकडून ती निश्चित करून पीएमआरडीएकडे सादर करण्यात आली. परिणामी, या दोन्ही नदीकाठच्या पूररेषेत बदल झाल्याने काही भूखंडांमध्ये फेरबदल करावा लागल्याने स्कीमची फेररचना पुन्हा करावी लागली. नगर रचना योजनेच्या क्षेत्रात आणि वाटप करावयचे भूखंडामध्येही बदल करावे लागले.
नव्याने फेररचना करण्यात आलेली प्रारूप नगर रचना योजना राज्य सरकारकडे पुन्हा मान्यतेसाठी पाठविण्यात आली होती, त्यास राज्य सरकारकडून मध्यंतरी मान्यता देण्यात आली. नगर रचना योजनेतील बदलावर पुन्हा सुनावणी घेण्यासाठी लवादाची नेमणूक करण्यात आली. लवादाकडून काम पूर्ण झाल्यानंतर ती अंतिम मान्यतेसाठी आता राज्य सरकारकडे पाठविण्यात आली आहे.