पुणे –मेट्रोच्या पुणे आणि पिंपरीमधील प्राधान्यमार्गाचे काम अंतिम टप्प्यात आले असून डिसेंबर 2021 अखेर हे दोन्ही मार्ग सुरू करण्यापूर्वी केंद्रीय मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्तांना पाहणी झाल्यानंतर हे दोन्ही मार्ग सुरू करण्यात येतील, अशी माहिती पुणे मेट्रोचे परिचालन आणि यंत्रणा संचालक विनोद कुमार आग्रवाल यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.
त्यानुसार, पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीत संत तुकारामनगर ते फुगेवाडी आणि पुणे महापालिका हद्दीत वनाज ते गरवारे महाविद्यालय हे दोन्ही मार्ग नव्या वर्षात पुणेकरांच्या सेवेत असतील, असा विश्वास अग्रवाल यांनी व्यक्त केला.
अग्रवाल म्हणाले की, या दोन्ही मार्गांचे सिव्हिल वर्क पूर्ण झाले असून रूळ टाकने, सिंग्नल यंत्रणा तसेच विद्युत पुरवठ्याच्या तारांचे कामही जवळपास पूर्ण झाले आहे. त्यानंतर आता स्थानकांची इतर आवश्यक कामे सुरू असून त्यात, अनेक बाबींचा समावेश आहे. एकाच वेळी ही कामे पूर्ण करण्यासाठी दहा विभाग कार्यरत असून त्यांच्या माध्यमातून हे काम सुरू आहे. त्यामुळे जास्तीत जास्त वेगाने हे काम पूर्ण करण्याचे नियोजन सुरू आहे. ही कामे पूर्ण झाल्यानंतर या कामांची पाहणी केंद्रीय मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्तांकडून केली जाणार आहे. त्यानंतरच, प्रत्यक्ष या दोन्ही मार्गांवर मेट्रो सुरू होणार आहे.
लॉकडाऊनमध्ये सर्वाधिक काम
लॉकडाऊनच्या कालावधीत महामेट्रोने गेल्या वर्षभरात सर्वाधिक वेगाने काम पूर्ण केले असल्याचे यावेळी अग्रवाल यांनी सांगितले. पुण्यातील कात्रज ते निगडी आणि वनाज ते रामवाडी हे दोन्ही मुख्य मार्ग असून या दोन्ही मार्गांचे एकत्रितपणे सुमारे 65 टक्के काम पूर्ण झाले आहे. तर उर्वरीत काम डिसेंबर 2022 पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे.