मेट्रो स्टेशन्सहून मिडी बसेसद्वारे प्रवासी सेवा
पुणे – पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीत वनाज ते रामवाडी आणि पिंपरी ते दापोडी या मार्गावर मेट्रो धावणार आहे. या मार्गावरील स्थानकांवरून पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून मिडी बसेसद्वारे “फिडर सेवा’ पुरवण्यात येणार आहे. यामुळे प्रवाशांना मेट्रो स्टेशनहून शहरात प्रवास करणे सहज शक्य होणार आहे.
पुणे आणि पिंपरी चिंचवड भागात सध्या वनाज ते रामवाडी आणि पिंपरी ते दापोडी या मार्गांवर मेट्रोचे काम सुरू आहे. या स्थानकांतून शहराच्या विविध भागांना जोडणारी पीएमपीची सेवा देण्यात येणार आहे. मेट्रोच्या दोन्ही मार्गांवर सुमारे 30 मेट्रो स्टेशन नियोजित असून, या मार्गांवर यूएमटीसीने नियोजित केलेल्या फिडर रूटवर संचलन होणार आहे.
स्थानकांचा प्रस्तावित नियोजनानुसार 300 बसेसची गरज आहे. तर मेट्रोचे विस्तारीकरण झाल्यानंतर 400 बसेसची आवश्यकता भासणार आहे. मेट्रो स्टेशनमध्ये मुख्य टर्मिनल, ट्रान्सफर स्टेशन, एअरपोर्ट शटल सेवेसाठी पीएमपी आणि मेट्रोकडून नियोजन देखील करण्यात येत आहे.
पीएमपी आणि मेट्रोदरम्यान कासारवाडी, डेक्कन, मनपा, रामवाडी ही ट्रान्सफर स्टेशन आणि वनाज, एअरपोर्ट, पिंपरी आणि स्वारगेट ही टर्मिनल स्टेशन नियोजित आहेत. टर्मिनल आणि ट्रान्सफर स्टेशनसाठी स्वतंत्र पार्किंगचे नियोजन देखिल करण्यात येणार आहे. याशिवाय विविध अद्ययावत तांत्रिक बाबींची व्यवस्था देखील करण्यात येणार असल्याची माहिती पीएमपी प्रशासनाकडून देण्यात आली