सर्वाधिक करोनामुक्त नागरिक पुणे शहरात
पुणे – जिल्ह्यात करोनाच्या पहिल्या लाटेपेक्षा दुसऱ्या लाटेमध्ये अधिक रुग्ण आढळले. या दोन्ही लाटांमध्ये शहर व ग्रामीण भागांतील दहा लाखांपेक्षा अधिक नागरिकांनी करोनावर मात केली आहे.
जिल्ह्यात करोनाचा पहिला रुग्ण दि. 9 मार्च 2020 रोजी आढळला. त्यानंतरच्या काळात निर्बंध कमी केल्यानंतर ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये करोनाच्या पहिल्या लाटेचा कहर झाला. दरम्यान, रविवारच्या आकडेवारीनुसार आतापर्यंत जिल्ह्यात 10 लाख 32 हजार 91 जणांना करोनाची लागण झाली, तर त्यापैकी 10 लाख 2 हजार 62 जण बरे झाले आहेत.
बरे झालेल्यांमध्ये पुणे शहरातील4 लाख 62 हजार 610, पिंपरी-चिंचवडमधील 2 लाख 47 हजार 602 आणि ग्रामीण भागातील 2 लाख 91 हजार 580 जणांचा समावेश आहे. दुसऱ्या लाटेमध्ये दैनंदिन रुग्णवाढ ही 12 हजारांच्या पुढे गेली होती. तर पहिल्या लाटेत ती पाच हजारांपर्यंत होती.
पटेल रुग्णालयातील “ओपीडी’ सुरू
पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या सरदार पटेल रुग्णालयात मंगळवारपासून करोना नसलेल्या रुग्णांना उपचारासाठी दाखल करून घेण्यात येणार आहे. त्यामुळे आता अन्य आजारांनी पीडित रुग्णांनदेखील पटेल रुग्णालयांत उपचार घेता येणार आहेत. शहरात मधल्या काळात करोनाबाधित वाढत असल्याने, खबरदारीचा उपाय म्हणून पटेल रूग्णालयातील बाह्यरूग्ण विभाग बंद करण्यात आला होता. तसेच केवळ करोना रुग्णांना दाखल करून घेतले जात होते.
त्र, आता रुग्ण्संख्या कमी झाल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. रुग्णालयाचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. विद्याधर गायकवाड म्हणाले, “रुग्णालयात सध्या 16 ते 17 करोना रुग्ण अति दक्षता विभागात (आयसीयू) उपचार घेत आहेत. त्यामुळे अन्य आजारांनी पीडित रुग्णांवरही उपचार व्हावेत. यासाठी त्यांना उपचारासाठी दाखल करून घेण्यात येणार आहे. तसेच रुग्णालयातील बाह्यरुग्ण विभागदेखील सुरू झाला आहे.’