डीलर पॉईंट न्यू रजिस्ट्रेशन प्रणाली, लर्निंग लायसन्स प्रक्रियेला सुरुवात
पुणे – परिवहन विभागाच्या “डीलर पॉईंट न्यू रजिस्ट्रेशन प्रणाली’च्या अंमलबजावणीला सोमवारपासून (14 जून) सुरुवात झाली. या योजनेत राज्यातील पहिल्या वाहनाची नोंद करण्याचा मान पुण्याने पटकावला. या प्रणालीमुळे वाहन नोंदणीची प्रक्रिया सोपी होणार असल्याने ग्राहक आणि वितरकांना दिलासा मिळणार आहे.
वाहन वितरकांकडूनच वाहनांची नोंदणी करणे आणि घरी बसून लर्निंग लायसन्सची चाचणी देणे या योजनेचे सोमवारी दुपारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते लोकार्पण झाले. त्यानुसार राज्यभरातील वाहन वितरकांनी स्वत: वाहन नोंदणी करण्यास सुरुवात केली.
पुण्यात बी.यू. भंडारी या वाहन वितरकाने राज्यात पहिली गाडी नोंद केली. यावेळी प्रादेशिक परिवहन अधिकारी डॉ. अजित शिंदे, आरटीओचे प्रणाली व्यवस्थापक मनोज बागमार आदी उपस्थित होते. वाहनांची नोंदणी झाल्यानंतर वाहन प्रणालीवरून संबंधित वाहनाचा “इन्फॉर्मेशन रिपोर्ट’देखील काढला. यासह शॉ टोयोटा या वितरकांकडून पहिल्या चारचाकीची नोंद केली.
ग्राहकाने नवीन वाहन विकत घेतल्यानंतर त्याच्या नोंदणीसाठी वितरकाकडून आवश्यक प्रक्रिया पूर्ण करून, सर्व कागदपत्रे आरटीओ कार्यालयात पाठवली जात होती. त्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पडताळणी करून त्यावर स्वाक्षरी केल्यावर प्रत्यक्ष नोंदणी होत असे. मात्र, आता “डीलर पॉईंट न्यू रजिस्ट्रेशन प्रणाली’नुसार वाहन नोंदणी केली जाणार आहे. यामध्ये वाहन नोंदणीसाठी वितरकाने आणि आरटीओ प्रशासनाने करावयाची पूर्ण प्रक्रिया वितरकाकडूनच केली जाणार असल्याची माहिती कार्यालयाकडून देण्यात आली.
नव्या नोंदणी प्रणालीमुळे प्रक्रिया सोपी झाली असून, कालावधी देखील कमी होणार आहे. त्यामुळे ग्राहकांच्या हाती लवकर वाहन सुपूर्द करता येणार आहे. यामध्ये सुरुवातीला घ्याव्या लागणाऱ्या ओटीपीची प्रक्रिया आव्हानात्मक आहे. या प्रक्रियेमुळे वेळेच्या बचतीसह आणि ग्राहकांना समाधान देखील मिळेल.
– प्रदीप लांडगे, “शॉ टोयोटा’
मुख्यमंत्र्यांनी “डीलर पॉईंट न्यू रजिस्ट्रेशन प्रणाली’चे लोकार्पण केले. त्या योजनेचे स्वागत करून, कार्यवाही सुरू झाली. पुण्यात पहिल्या वाहनाची नोंद झाली.
– डॉ. अजित शिंदे, (प्रादेशिक परिवहन अधिकारी, पुणे)