पुणे (प्रभात वृत्तसेवा) : महापालिका अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभारामुळे महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांना प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींसमोर दिलगीरी व्यक्त करण्याची वेळ आली आहे. महापालिकेत प्रशासक नेमल्यानंतर पालिकेच्या आवारात कोणालाही पत्रकार परिषद घेता येणार नसल्याचा मनमानी फतवा सुरक्षा विभागाचे प्रमुख माधव जगताप आणि जनता संपर्क अधिकारी यांनी आयुक्त अथवा अतिरिक्त आयुक्तांचे आदेश नसतानाही काढला. तसेच पत्रकार परिषद घेण्यासाठी आलेल्या आम आदमी पक्षांच्या कार्यकार्त्यांना सुरक्षा रक्षकांनी येऊन मज्जाव केला. या प्रकरणी प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींनी थेट आयुक्तांकडे तक्रार केल्यानंतर आयुक्त विक्रम कुमार यांनी याबाबत दिलगीरी व्यक्त केली.
महापालिकेवर प्रशासकीय कारभार असल्याने विस्तारीत इमारतीमधील राजकीय पक्षांची कार्यालये तसेच पदाधिकाऱ्यांची कार्यालये बंद आहेत. मात्र, या ठिकाणचा पत्रकार कक्ष सुरू आहे. त्यामुळे महापालिकेची समस्या घेऊन आलेले नागरीक, राजकीय पक्षाचे पदाधिकारी या ठिकाणी पत्रकार परिषद घेतात. शुक्रवारी आम आदमी पक्षाची पत्रकार परिषद होती, यावेळी पालिकेच्या सुरक्षा रक्षकांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांना हुसकावण्याचा प्रयत्न केला.
पत्रकार परिषद असल्याने प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींनी असे करू नका म्हणत विनंती केली. तसेच सुरक्षा प्रमुख माधव जगतापांशी संपर्क साधला.
मात्र, त्यांनी अरेरावीची भाषा करत पत्रकार परिषद घेता येणार नाही असे सांगत वाद घातला. तसेच जनता संपर्क विभाग तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांचे नाव पुढे केले. त्यानंतर सर्व प्रसार माध्यम प्रतिनिधींनी आयुक्तांची भेट घेतल्यानंतर आयुक्त कुमार यांनी याबाबत दिलगीरी व्यक्त केली, तसेच या पुढे असे प्रकार होणार नाहीत याची ग्वाही देत संबधित अधिकाऱ्यांना सूचना करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले.