पोचेफस्टॉर्म – महिला ज्युनिअर विश्वकरंडक हॉकी स्पर्धेत शुक्रवारी झालेल्या लढतीत भारतीय संघाने दक्षिण कोरियाचा 3-0 असा पराभव केला. या विजयासह भारतीय संघाने या स्पर्धेच्या उपांत्य फेरीत दिमाखात प्रवेश केला. स्पर्धेच्या इतिहासात उपांत्य फेरीत स्थान मिळवण्याची भारतीय महिला संघाची ही केवळ दुसरीच वेळ आहे.
उपांत्यपूर्व फेरीच्या या सामन्यात भारतीय संघाकडून भरात असलेल्या मुमताज खानने 11 व्या मिनिटाला गोल केला व संघाचे खाते उघडले. त्यानंतर 15 व्या मिनिटाला लिर्लीन्डकीने गोल केला व पहिला हाफ संपण्यापूर्वीच भारताला 2-0 अशी भक्कम आघाडी मिळवून दिली.
दुसरा हाफ सुरू झाल्यावर कोरियाच्या खेळाडूंनी भारताचा बचाव भेदण्याचा वारंवार प्रयत्न केला मात्र, त्यांना यश आले नाही. सामन्याच्या 41 व्या मिनिटाला संगीता कुमारीने गोल केला व संघाची आघाडी 3-0 अशी आणखी भक्कम केली. या स्पर्धेच्या इतिहासात अंतिम फेरी गाठण्याची तसेच त्याही फेरीत सरस खेळ करत विजेतेपद मिळवण्याची संधी भारतीय संघाला मिळाली आहे.
यापूर्वी 2013 साली भारतीय संघाने उपांत्य फेरी गाठली होती, मात्र, त्यांना पराभवाचा सामना करावा लागला व ब्रॉंझपदकावर समाधान मानावे लागले होते. उपांत्य फेरीत आता भारताची लढत तीनवेळचे विजेते थायलंड व दक्षिण आफ्रिका यांच्यातील विजेत्याशी येत्या रविवारी होणार आहे.