पुणे – दरवर्षी प्रामाणिकपणे मिळकतकर भरणाऱ्या पुणेकरांसाठी यंदा महापालिकेकडून तब्बल एक कोटी रुपयांची बक्षिसे दिली जाणार आहेत. त्यासाठीची लॉटरी रविवारी काढली जाणार आहे.
पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत शिवाजीनगर पोलीस वसाहत येथील हुतात्मा शिरीष कुमार विद्यालय येथे होणार आहे. महापालिका आयुक्त विक्रम कुमार, कर संकलन विभागाचे प्रमुख उपायुक्त अजित देशमुख यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होणार आहे. महापालिकेकडून पहिल्यांदाच अशा प्रकारे लॉटरी काढण्यात येणार आहे. ही सर्व लॉटरी ऑनलाइन असणार आहे.
अशी आहेत बक्षिसे
यामध्ये 5 कार, 15 ई-बाइक, 10 लॅपटॉप आणि 15 मोबाइल बक्षीस दिले जाणार असल्याची घोषणा महापालिकेने केली होती. त्यात 25 हजारांपेक्षा कमी कर असणारे 25 हजार ते 50 हजारांपर्यंत कर भरणारे तसेच 50 हजारांच्या पुढील कर असणाऱ्या नागरिकांचा समावेश आहे. ही सर्व लॉटरी ऑनलाइन काढण्यात येणार आहे. तर महापालिकेने दिलेल्या दि. 2 ऑगस्टपर्यंत दिलेल्या मुदतीच्या आत कर भरलेले सुमारे 7 लाख 63 हजार पुणेकरांनी मिळकतकर भरला असून या लॉटरीत सुमारे 45 पुणेकरांना बक्षिसे मिळणार आहेत. या लॉटरीसाठी 2 ऑगस्टपूर्वी कर भरणारे सर्व करदाते पात्र आहेत.