पुणे – कर संकलन वाढीसाठी पालिकेने तब्बल एक कोटी रुपयांच्या बक्षिसांची घोषणा केली होती. त्यासाठी लकी ड्रॉ काढत विजेत्यांची नावे जाहीर केली आहेत. मात्र, या बक्षिसांची खरेदी प्रक्रिया सुरूच असल्याने विजेत्यांना पुढील महिनाभराच्या आत या वस्तू देण्याच्या सूचना महापालिका आयुक्तांनी केल्या आहेत.
लकी ड्रॉ योजनेअंतर्गत भाग्यवंत मिळकतधारकांना पाच पेट्रोल कार, 15 ई-बाइक, 15 मोबाइल फोन, 10 लॅपटॉप अशी बक्षिसे जाहीर करण्यात आली. मात्र, यातील प्रमुख बक्षिस असलेल्या पेट्रोल कारची खरेदीच झालेली नाही. तर इतर वस्तू महापालिकेस टप्प्याटप्प्याने मिळत आहेत. ही लॉटरी मिळकतकर विभागाने काढली असली, तरी बक्षिसांची खरेदी मात्र वाहन विभाग आणि भांडार विभाग करणार आहे. त्यातच महापालिकेला कार खरेदी करण्यासाठी खर्चाचे बंधन शासनाने घालून दिलेली आहे. ही वाहने महापालिका थेट विजेत्यांच्या नावावर करून देणार आहे. त्यामुळे ही सर्व प्रक्रिया होण्यास महिनाभर जाणार आहे.
कारने केले बेजार
या लकी ड्रॉमध्ये सर्वात मोठे बक्षीस कारचे आहे. त्यामुळे ही कार थेट खरेदी करायची, की निविदा मागवून? ती कोणत्या कंपनीची असावी? रंग कोणता असावा? अशा अनेक प्रश्नांमुळे प्रशासन बेजार झाले आहे. त्यातच महापालिकेस कोणतेही वाहन घ्यायचे झाल्यास त्यासाठी निधीचे बंधन असते. त्यामुळे महापालिकेस आपल्या बजेटमध्येच ही गाडी घ्यायची असून, प्रशासकीय पातळीवर हे निर्णय अंतिम होत नसल्याचे चित्र आहे.