पुणे – कोथरूड कचरा डेपोची जागा मेट्रो डेपोसाठी देण्यात आली. त्यामुळे येथील कचरा हस्तांतरण केंद्र तसेच कोंडवडा बावधन मधील स.नं 67 मधील जकात नाक्याच्या जागेवर करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने 2019 मध्ये घेतला होता. हाच निर्णय राज्यशासनाने कायम ठेवला आहे.
2019 मध्ये महापालिकेने या जागेवर प्रत्यक्ष खोदाईचे काम सुरू केले होते. मात्र, स्थानिक नागरिक तसेच लोक प्रतिनिधींनी त्यास विरोध केल्याने महापालिकेने हे काम थांबविले होते. मात्र, आता शासनानेच मान्यता दिल्याने महापालिकेस मोठा दिलासा मिळाला आहे. या जागेत मेट्रोचा कारडेपो झाला आहे. परिणामी, ही सर्व जागा महामेट्रोकडे हस्तांतरित करायची आहे. येथे वारजे-कर्वेनगर तसेच कोथरूड क्षेत्रीय कार्यालयाचे कचरा हस्तांतरण केंद्र तसेच रॅम्प आहे.
या दोन्ही क्षेत्रीय कार्यालयांच्या कचरा वाहतुकीची वाहने येथेच उभी केली जातात. मात्र, मेट्रोचे संचलन सुरू झाल्याने महापालिकेस ही जागा महामेट्रोला हस्तांतरित करायची आहे. बावधन स. नं 64 मधील या जागेत कचरा हस्तांतरण केंद्र व रॅम्प उभारल्यास या दोन्ही क्षेत्रीय कार्यालयांची कचरा वाहतूक समस्या कायमची सुटण्यासाठी या जागेस मान्यता देण्यात आली.
मात्र, जागेच्या आसपास बांधकामे झाल्याने लोकवस्तीच्या जवळ हे केंद्र होईल, अशी भूमिका घेत स्थानिक व्यक्ती तसेच तत्कालीन नगरसेवकांनी त्यास विरोध केला. त्यामुळे नगरसेवकांनी डिसेंबर 2021 मध्ये महापालिकेची मुदत संपताना या जागेवरील कचरा हस्तांतरण केंद्राचा ठराव दप्तरी दाखल केला. तसेच ही जागा प्रशासनाने नागरिकांना दैनंदिन वापर तसेच पीएमपीला द्यावी, असा निर्णय मुख्यसभेत घेतला.
आयुक्तांनी केली होती मागणी
महापालिकेत समाविष्ट झालेली गावे तसेच या दोन्ही क्षेत्रीय कार्यालयांच्या कचरा व्यवस्थापनाच्या अडचणी लक्षात घेऊन मुख्यसभेने 2021 मधे केलेला ठराव विखंडीत करावा, असे पत्र महापालिकेने जुलै 2022 मध्ये नगरविकास विभागास पाठविले होते. त्याबाबत 28 जुलै 2023 रोजी निर्णय घेण्यात आला आहे. त्यात हस्तांतरण केंद्र रद्द करण्याचा मुख्यसभेचा 2021 चा ठराव शासनाने विखंडीत केल्याचे महापालिकेस कळविले आहे. परिणामी, बावधन येथे कचरा हस्तांतरण केंद्र तसेच रॅंप सुरू करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.