पुणे – मागील तीन आठवड्यांपासून खंड पडलेला पाऊस राज्यात पुन्हा सुरू होण्याची शक्यता आहे. येत्या 25 ऑगस्टनंतर पश्चिमी वाऱ्यांची तीव्रता वाढणार असल्यामुळे पुढील दोन ते तीन दिवसात राज्यातील पावसाला पुन्हा सुरुवात होईल, असा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तविला आहे.
दरम्यान, उत्तर गुजरातवर वाऱ्याची चक्रीय स्थिती निर्माण झाल्यामुळे उत्तर कोकण आणि उत्तर महाराष्ट्राच्या तुरळक भागांत मेघगर्जनेसह पाऊस पडेल. तर दि. 25 ऑगस्टनंतर पश्चिमी वाऱ्याची तीव्रता वाढणार आहे. त्यामुळे काही भागांत मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
पुण्यात हलक्या सरींचा अंदाज
पुणे शहरात दिवसभर ऊन आणि ढगाळ वातावरणाचा लपंडाव सुरू आहे. तर दिवसाआड पाऊस पडत असला तरी, समाधानकारक पाऊस नाही. गेल्या 24 तासात शहराच्या मध्यवर्ती भागात 3 मिमी पावसाची नोंद झाली. तर पुढील दोन दिवस ढगाळ वातावरण आणि हलक्या सरी पडतील, असा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तविली आहे.