पुणे – दिवाळी, छटपर्वच्या निमित्ताने मूळगावी जाणाऱ्या नागरिकांची संख्या अधिक असते. अनेकजण लांब पल्ल्याचा प्रवास करण्यास रेल्वेला पसंती देत असून, यंदा सण आणि पर्यटनासाठी बाहेरील शहरांत जाणाऱ्या प्रवाशांची संख्यादेखील अधिक असते. करोनाच्या पार्श्वभूमीवर “कन्फर्म’ तिकीट असणाऱ्या नागरिकांनाच प्रवास करण्याची मुभा असल्याने नागरिकांना यावर्षी प्रवासाचे “बुकींग’ लवकर केले आहे. यंदा उत्सवांच्या सुमारे पंधरा दिवस आधीच पुण्यामार्गे धावणाऱ्या बहुतांश लांब पल्ल्याच्या रेल्वेचे बुकिंग “फुक्क’ झाले असून, वेटींग लिस्टदेखील वाढत चालली आहे.
दुसऱ्या लाटेनंतर झालेल्या अनलॉकपासून बहुतांश रेल्वेचे संचलन सुरू झाले असून, सध्या सुमारे 80 टक्के रेल्वेंचे संचलन सुरू आहे. नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या दिवाळी आणि छटपूजा आदी सणांच्या निमित्ताने प्रवाशांनी गावी आणि पर्यटनासाठी अन्य शहरांमध्ये जातात. मागील दीड वर्षांपासून करोनामुळे पर्यटन आणि गावी जाता न आल्याने यंदा तुलनेने प्रवाशांची संख्या अधिक आहे. कोविडच्या पूर्वी पुणे स्थानकातून सुमारे 290 रेल्वेची वाहतूक सुरू होती. मागील वर्षी मार्च महिन्यात बहुतांश रेल्वेची सेवा स्थगित केली होती. मात्र, आता पुन्हा रेल्वेंची संख्या वाढली आहे. पुणे स्टेशनहून 200 रेल्वेची ये-जा सुरू आहे.
रेल्वेसाठी शेकडो प्रवासी वेटिंगवर
लखनौ, गोरखपूर, पटना, बिहार, दिल्ली, गुजरातकडे जाणाऱ्या रेल्वेला अधिक गर्दी आहे. तर, राज्यांतर्गत मार्गांपैकी विदर्भात जाणाऱ्या रेल्वेचे बुकिंग “फुल्ल’ झाले आहे. दिवाळीपूर्वी धावणाऱ्या पुणे-जयपूर, पुणे-गोरखपूर, पुणे -राजकोट, पुणे-भुवनेश्वर, पुणे-अहमदाबाद, पुणे-लखनऊ, पुणे-नागपूर, पुणे-दानापूर, कोल्हापूर-गोंदिया, पुणे-नागपूर, पुणे-जम्मूतावी झेलम एक्स्प्रेस, पुणे-हावडा एक्स्प्रेस मार्गांवरील रेल्वेचे बुकिंग 100 टक्के पूर्ण झाले आहे. तर या मार्गांवरील रेल्वेसाठी शेकडो प्रवासी वेटिंगवर असल्याचे चित्र आहे.