आंबेगाव तालुक्यात राष्ट्रवादीचा मेळावा
जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत नाराजांची धास्ती
महाळुंगे पडवळ – राज्य सरकारला कितीही त्रास दिला तरी महाविकास आघाडीचे सरकार पाच वर्षे टिकणार. आपल्याला त्रास देणाऱ्याला आपण पुरून उरणार, असा घणाघात गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी भाजपवर केला.
कळंब-चांडोली जिल्हा परिषद गटातील कार्यकर्त्यांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या कार्यकर्ता मेळाव्यात बोलत होते. कळंब येथे हा मेळावा पार पडला. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी राष्ट्रवादीचे पदाधिकारी व कार्यकर्तिे उपस्थित होते.
वळसे पाटील म्हणाले, केंद्रातले भाजप सरकार राज्याशी सुडबुद्धीने वागत आहे आणि हे सर्वांना माहित आहे. यासाठी वेगवेगळ्या संस्थांचा कसा वापर होतोय, हेही सर्वांना माहीत आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसला आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका मोठ्या प्रमाणावर जिंकायच्यात; पण आपल्याला दुसरी कोणाची भीती नाही तर आपल्यातीलच काही नाराजांची भीती असल्याची उद्विग्नता त्यांनी यावेळी बोलून दाखवली.
विधानसभेला जसे राष्ट्रवादी कॉंग्रेसला मतदान होत तसं जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत झाले पाहिजे आणि निवडून आलेल्या लोकप्रतिनिधीने सुद्धा लोकांसाठी चांगलं काम केलं पाहिजे, असा आशावाद त्यांनी बोलून दाखवला.
जिल्हा परिषद गटातल्या प्रमुख लोकांनी निवडणुका जाहीर होण्याआधीच आपापल्या मतदार संघात लोकांमध्ये जाऊन त्यांचं म्हणणं समजून घेतलं पाहिजे. यासोबत सरकार आणि पक्षाची मराठा आरक्षणा संदर्भातील भूमिका समजून सांगितली पाहिजे अशी अपेक्षा वळसे यांनी यावेळी व्यक्त केली.
स्थानिक निवडणुकीत प्रचाराला मर्यादा
‘आगामी काळात राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष जिल्हा परिषद पंचायत समिती आणि विविध संस्थांवर तरुणांना संधी देणार आहे. स्थानिक लोकप्रतिनिधीनी गावागावात जाऊन लोकांना आतापासून भेटायला हवं. आपल्याकडे राज्यात महत्वाची जबाबदारी असल्याने स्वतःला स्थानिक स्वराज्य निवडणुकामध्ये जास्त वेळ देता येणार नाही. तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने राज्याचा राजकारणात मला मोठी संधी मला मिळाली. राज्यात पण मोठं व्हावं, आणि प्रचाराला पण यावं, असं असेल तर जमणार नाही असंही वळसे पाटील म्हणाले.
प्रभाकर यांच्या प्रकरणावर मौन
दरम्यान, रविवारी दिवसभर गाजत असलेल्या साक्षीदार प्रभाकर यांनी केलेल्या 25 कोटीच्या गौप्यस्फोट प्रकरणावर मात्र गृहमंत्री वळसे पाटील यांनी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर बोलण्यास नकार दिला.