पुणे – शहरातील अनधिकृत बांधकामांची यादी थेट महापालिकेच्या संकेतस्थळावर टाकली जाणार आहे. अशी बांधकामे उभारून घरे अथवा मिळकती विकणार्या व्यावसायिकांवर महापालिकाच फसवणुकीचे गुन्हे दाखल करणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी दिली.
आंबेगाव बु. येथे मनपा बांधकाम विभागाच्या कारवाईत सुमारे ५०० कुटूंबे उद्ध्वस्त झाली. ही बांधकामे अनधिकृत असतानाही वेळीच कारवाई न करण्यात आली नाही. तसेच नागरिकांमध्ये याबाबत जागृतीही केली नाही. त्यामुळे ही वेळ ओढावली असून भविष्यातील अशा घटनांना आळा घालण्यासाठी महापालिकेने अशा बांधकामांची यादीच प्रकाशित करण्याचा निर्णय घेतला आहे.
आंबेगावतील या इमारतींना सन २०२१ मध्ये नोटीस देण्यात आल्या होत्या. त्यानंतर किरकोळ कारवाई करत इमारतीचे बांधकाम पूर्ण होउन सदनिका विक्री होण्याची वाट पाहण्यात आली. नागरिकांनी घरांचा ताबा घेण्यास सुरूवात करताच ११ इमारती जमीनदोस्त करण्यात आल्या आहेत. त्यामुळे महापालिकेवर टीका होत आहे. त्यावर असे प्रकार टाळण्यासाठी महापालिकेने कठोर धोरण राबविण्याचा निर्णय घेतला आहे.
इत्यंभूत माहिती मिळणार
शहरातील अनधिकृत बांधकामास नोटीस बजावल्यानंतर त्याची माहिती पालिकेच्या संकेतस्थळावर देण्यात येणार आहे. संबधित बांधकामावर कधी कारवाई केली, त्याचे फोटो तसेच त्यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला असल्यास त्याची माहितीही दिली जाणार आहे. परिणामी, अशा बांधकामांमध्ये घर घेताना नागरिकांना आधीच माहिती मिळाल्यास त्यांची फसवणूक तसेच आर्थिक नुकसान होणार नाही.
“नागरिकांंनी घरासाठी आयुष्यभराची कमाई खर्च करताना बांधकाम अधिकृत आहे की अनधिकृत याची माहिती महापालिका अथवा महारेरा कडून घ्यावी. त्यानंतरच योग्य ती खातरजमा करून घर घ्यावे असे आवाहन आहे.” – विक्रम कुमार, आयुक्त, महापालिका